मुसळधार पावसाने मालवणला झोडपले; घुमडाई मंदिराला पाण्याचा वेढा : समुद्र खवळला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मालवण

उशीरा दाखल झालेला मान्सून आगमनानंतर काहीसा रुसून बसल्यामुळे बळीराजा चिंतातूर बनला होता. मात्र मंगळवारी रात्री तसेच बुधवारी सकाळी वरूणराजाने मालवण शहराला अक्षरशः झोडपून काढले. विजांचा लखलखाट आणि ढगांच्या गडगडाटासह कोसळलेल्या पावसाने हाहाकार माजवला.

दरम्यान, बुधवारी सकाळी आठ वाजेपर्यंत ६१ मिमी पावसासह आतापर्यंत ५१२ मिमी पाऊस पडल्याची नोंद तालुका तहसीलदार कार्यालयात करण्यात आली आहे. २९ जून पर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मान्सूनच्या दमदार सरी नंतर समुद्र खवळला असून जोरदार लाटा किनाऱ्यावर धडकत आहेत.

मंगळवारी रात्रभर कोसळणाऱ्या संततधार पावसामुळे मालवण शहरातील देऊळवाडा,आडवण, रेवतळे, गवंडीवाडा, धुरीवाडा आदी भागात पाण्याचे साम्राज्य पसरले होते. देऊळवाडा तसेच सागरी महामार्गानजीकच्या मळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. आडवण परिसरातील सर्व रस्ते पाण्याखाली गेले होते. तालुक्याच्या ग्रामीण भागातही मुसळधार पाऊस कोसळला. बुधवारी सकाळच्या सत्रातही अपेक्षित पाऊस कोसळला. दुपारनंतर संततधार पावसाने विश्रांती घेतली. पावसामुळे वीज व दूरध्वनी सेवा काही ठिकाणी ठप्प झाली होती. वायरी येथे धाकु रावले यांच्या घरावर झाड कोसळून १५ हजाराचे नुकसान झाले.

घुमडेतील घुमडाई मंदिराला पाण्याचा वेढा
मुसळधार पावसाचा घुमडे गावलाही फटका बसला. घुमडाई मंदिरानजीक असलेल्या ओहोळाला पूर आल्याने घुमडाई मंदिराला पाण्याने वेढा दिला होता. २००० साली याच ओहोळाला आलेल्या पुरात घुमडाई मंदिराच्या कळसापर्यंत पाणी आले होते तसेच गावातील अनेक घरे देखील पाण्याखाली गेली होती. काही वर्षांपूर्वी मंदिराचे नूतनीकरण झाले. दोन दिवस पडलेल्या मुसळधार पावसात ओहोळाच्या पाण्याने मंदिराला वेढा घातल्याने ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.