अखेर रायगडात पाऊस बरसला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । अलिबाग

गेले अनेक दिवस रायगडकर ज्‍याची आतुरतेने वाट पहात होते तो पाऊस आज अखेर बरसला. जिल्‍हयाच्‍या सर्वच भागात आज पावसाने कमीअधिक प्रमाणात हजेरी लावली. त्‍यामुळे उकाडयाने हैराण नागरीकांना मोठा दिलासा मिळाला आहे. शिवाय शेतकऱ्यावरील दुबार पेरणीचं संकटही टळलं आहे.

22 तारखेलाच मान्‍सून रायगड जिल्‍हयात स्थिरावल्‍याचे वेधशाळेकडून सांगण्‍यात येत होते. परंतु प्रत्‍यक्षात तो बरसत नव्‍हता. त्‍यामुळे रायगडकर हैराण झाले होते. कडकडीत उन्‍हाने अंग भाजून निघत होते. दुसरीकडे मान्‍सूनपूर्व पावसामुळे उगवून वर आलेली रोपे पिवळी पडायला लागली होती. त्‍यामुळे शेतकरीदेखील धास्‍तावला होता. आकाशत ढगांची गर्दी दिसत होती परंतु पाऊस काही कोसळायला तयार नव्‍हता.

निराशेचे वातावरण असताना रात्री उशिरा पावसाने जिल्‍हयाच्‍या उत्‍तर भागात हजेरी लावली. अलिबाग, पेण, पाली, नागोठणे भागात पहाटेपर्यंत अधून मधून पाऊस कोसळत होता. सकाळी पावसाने पुन्‍हा उघडीप घेतली दुपारपर्यंत कडकडीत ऊन पडले होते.

दुपारनंतर पुन्‍हा आकाशात ढगांची दाटी व्‍हायला सुरूवात झाली. आणि थोडयाच वेळात पावसाने बरसायला सुरूवात झाली. जिल्‍हयात महाड, पोलादपूर, म्‍हसळा, श्रीवर्धन, रोहा, माणगाव, मुरूड भागात पावसाच्‍या हलक्‍या ते मध्‍यम सरी कोसळल्‍या. पावसाच्‍या आगमनाने वातावरणात गारवा पसरला आहे आल्‍हाददायक वातावरण तयार झाले आहे.

गेले काही दिवस पावसाच्‍या प्रतिक्षेत असलेल्‍या भातरोपांना आजच्‍या पावसामुळे जीवदान मिळाले आहे. त्‍यामुळे आता भाताची दुबार पेरणी करावी लागणार नाही. त्‍यामुळे शेतकऱ्यांची मोठी चिंता मिटली आहे. आज सकाळी संपलेल्‍या 24 तासांमध्‍ये जिल्‍हयात 16.53 च्‍या सरासरीने 264.50 मिलीमीटर पावसाची नोंद झाली.

पावसाची तालुकावार आकडेवारी (मि.मी.)
सामना प्रतिनिधी । अलिबाग – 21, पेण – 1, मुरूड – 17, पनवेल – 10.60, उरण – 10, कर्जत – 11, खालापूर – 11, माणगाव – 14, रोहा – 12, सुधागड – 5, तळा – 19, महाड – 5, पोलादूपर – 47, म्‍हसळा – 46, श्रीवर्धन – 32, माथेरान – 2.90, एकूण – 264.50