दुष्काळग्रस्त महाराष्ट्राला विशेष मदत द्या! शिवसेनेची राज्यसभेत मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नवी दिल्ली

महाराष्ट्रात अभूतपूर्व दुष्काळाची परिस्थिती आहे. जून महिना संपत आला तरी राज्यात अजून पुरेसा पाऊस झालेला नाही. विशेषतः मराठवाडा आणि विदर्भात परिस्थिती खूपच गंभीर आहे. नरेंद्र मोदींनी पुन्हा सत्तेवर आल्यानंतर ‘पेयजल’ नावाचे नवे खाते दूरदृष्टीने सुरू केले आहे. दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या महाराष्ट्राला केंद्र सरकारने विशेष मदत द्यावी, अशी आग्रही मागणी आज शिवसेनेने राज्यसभेत केली.

देशभरातील पाणीटंचाईवर सभागृहात झालेल्या चर्चेत सहभागी होताना शिवसेना खासदार अनिल देसाई यांनी महाराष्ट्रातील भीषण दुष्काळाकडे सभागृहाचे लक्ष वेधले. महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त स्थिती लक्षात घेता उंच ठिकाणी असलेले पाणी खालच्या आणि दुष्काळग्रस्त भागाला देण्याचा निर्णय झाला होता, मात्र त्यामुळे जिह्याजिह्यांमध्ये पाणी कलह वाढला असून मोठे वाद निर्माण होत आहेत. सरकारने पाणीटंचाईवर जालीम उपाय करण्यासाठी दीर्घकालीन उपाय तर योजावेतच, परंतु सध्या महाराष्ट्राची तातडीची गरज लक्षात घेता सरकारने विशेष मदत राज्याला द्यावी, अशी मागणी खासदार देसाई यांनी यावेळी केली. समुद्राच्या पाण्याचे चांगल्या पाण्यात रूपांतर करून बर्‍यापैकी पाणीटंचाईला आळा घालता येईल. त्याचबरोबर पाणी वाचविण्यासाठी मोठे जनजागृती अभियान हाती घेण्याची गरजही त्यांनी बोलून दाखवली. पाणीटंचाईला वेळीच आळा घातला नाही तर यापुढे पाण्यासाठी युद्धे भडकतील, असा इशाराही अनिल देसाई यांनी यावेळी बोलताना दिला.