
सामना प्रतिनिधी । मुंबई
मुंबईतील 2011 पर्यंतची घरे-झोपडय़ा आणि दुकानांना आता पालिकेकडून संरक्षण मिळणार असून ती पात्र ठरणार आहेत. पात्रतेसाठी घरांना याआधी 1962-64 च्या पुराव्यांची अट अनिवार्य होती. मात्र पालिकेच्या या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे रखडलेले हजारो पुनर्विकास प्रकल्प मार्गी लागणार असून मुंबईच्या विकासाला गती मिळणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार होत असलेल्या या महत्त्वाकांक्षी निर्णयावर उद्या महापौर प्रिं. विश्वनाथ महाडेश्वर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱया गटनेत्यांच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब होणार आहे.
मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील हजारो पुनर्विकास प्रकल्प अनिवार्य पुराव्यांअभावी रखडले आहेत. यामध्ये अनिवासी झोपडय़ा-घरे, गाळ्यांच्या पात्रतेसाठी 1962 तर निवासी घरे-झोपडय़ा, गाळ्यांसाठी 1964चे पुरावे अनिवार्य करण्यात आले आहेत. मात्र शेकडो मालमत्ता धारकांकडे इतक्या वर्षांपूर्वीचे पुरावे मिळणे अवघड झाले आहे. पुराव्यांच्या या जाचक अटीमुळे अनेक गोरगरीबांवर आपल्या हक्काचा निवारा गमावण्याची वेळ आली आहे. तर कित्येकांना आपला छोटय़ा-मोठय़ा व्यवसायावर पाणी सोडण्याची वेळ आली आहे. विशेष म्हणजे पात्रतेच्या अटीमुळे पुनर्विकास प्रकल्पही रखडून पडले आहे. यामुळे अनेक ठिकाणी विकासकामेही खोळंबली आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गोरगरीबांना न्याय मिळवून देण्याची भूमिका मांडली होती. या पार्श्वभूमीवर शनिवारी गटनेत्यांची तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. यामध्ये 2011 पर्यंतचे पुरावे असणाऱया घरे-झोपडय़ा, गाळेधारकांना संरक्षण मिळण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब होईल.
प्रकल्पग्रस्तांनाही होणार फायदा
पालिकेच्या माध्यमातून अनेक प्रकल्प, नवीन रस्ते, रस्ता-नदी-नाले रुंदीकरण अशी विकासकामे करताना अडथळा ठरणारी बांधकामे हटवली जातात. मात्र 1962-64च्या पुराव्यांच्या अटीमुळे या ठिकाणी वर्षानुवर्षे राहणाऱया रहिवासी-व्यावसायिकांवर संकट कोसळते. मात्र या निर्णयामुळे हजारो मुंबईकरांना दिलासा मिळणार आहे.
पात्रतेसाठी 1962-64च्या पुराव्याच्या अटीमुळे हजारो मुंबईकरांना त्यांच्या झोपडय़ा-घरांना संरक्षण मिळणे कठीण बनले आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महानगर पालिकेच्या माध्यमातून त्यांना दिलासा देण्यासाठी पुराव्यांची अट 2011 करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. यामुळे संपूर्ण मुंबईच्या विकासाला आणखी गती मिळण्यास मदत होणार आहे.
– प्रिं. विश्वनाथ महाडेश्वर, महापौर




























































