
>> डॉ. सुधीर देवरे
31 मे 2019 ला रात्री 11 वाजता म. सु. पाटील सर उैर्फ बाबा यांचं निधन झालं. ही दुःखद बातमी समजताच सरांशी झालेल्या पहिल्या भेटीपासून ते आतापर्यंतच्या त्यांच्या समग्र आठवणी अगदी कालच घडल्यासारख्या मनात सहज तरळून आल्या.
म. सु. पाटील सरांशी माझी पहिली प्रत्यक्ष भेट मनमाडला 1985-86 च्या दरम्यान झाली (त्याआधी सरांशी आणि पुपाजींशी मी आठवीत असतानापासून पत्रसंवाद होता. ‘अनुष्टुभ’ नियतकालिकामुळे). मनमाड महाविद्यालयात सर प्राचार्य होते. त्यांच्या निरोपानुसार त्या रविवारी सटाण्याहून डॉ. मोहन माजगावकर दादा आणि आम्ही काही मित्र (प्रा. शं. क. कापडणीस, डॉ. एकनाथ पगार, डॉ. दिलीप धोंडगे आणि मी) मनमाडला गेलो होतो. कॉलेजच्या त्यांच्या निवासस्थानावर पोचलो सकाळच्या गप्पात हॉलमध्ये घरगुती पद्धतीने खाली टाकलेल्या सतरंज्यांवर (सरांसह) भिंतींच्या कडेकडेने बसत आम्ही प्रत्येकाने आपापल्या दोन-दोन कविता वाचल्या. कवितांवर ‘‘व्वा व्वा, क्या बात है’’ वगैरे नेहमीची ठरलेली उडती दाद न येता धीरगंभीर प्रतिसाद मिळत होते. म. सु. पाटील सर अशा गंभीर प्रतिक्रियांना सुरुवात करत. मोजकेच आणि अनौपचारिक बोलत.
दुपारनंतरच्या अनौपचारिक सत्रात पाटील सरांनी ‘विदुषकी कविता’ शीर्षकाखाली अनेक कवींच्या कवितांवर लिहिलेली त्यांची समीक्षा वही अतिशय संयत, सावकाश आणि संथ गतीने वाचून दाखवली. या समीक्षेला खास ‘मसु’ टच होता. ही समीक्षा म्हणजे एक दीर्घ कविताच असल्याचं लक्षात येत होतं. समीक्षेतही सृजन असतं हे या समीक्षेतून दिसून येत होतं. खुद्द सरांच्या तोंडून त्यांची समीक्षा ऐकण्याचा तो योग अपूर्व होता. कवितेसारखी कवितेच्या समीक्षेलाही दाद देता येते असं पहिल्यांदा वाटू लागलं. यानंतर काही दिवसांनी सटाणा येथील आमच्या साहित्यायन संमेलनाच्या एका चर्चासत्राचं अध्यक्षस्थान बाबांनी- सरांनी स्वीकारावं म्हणून आम्ही त्यांना विनंती केली होती. पाटील सर संमेलनाला आले आणि कवितेवर मार्गदर्शनपर उत्तम बोलले. ही आमची दुसरी भेट.
द. ग. गोडसे यांच्या कलामीमांसेचा मी अभ्यास करत होतो. द. ग. गोडसे यांच्या वयाच्या पंच्याहत्तर वर्षांनिमित्ताने त्यांच्या कलामीमांसेवर देवरुख येथे चर्चासत्र आयोजित केले होते. संस्थेचे अध्यक्ष अरुण आठल्ये, प्राचार्य डॉ. सुरेश जोशी, मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागप्रमुख सरोजिनी वैद्य हे संयोजक होते. या चर्चासत्रासाठी महाराष्ट्रातील एकूण 35 अभ्यासक निमंत्रित होते. त्यात म. सु. पाटील सर आणि मीही निमंत्रित होतो. मी आणि पाटील सर एकत्रच असायचो. पहिल्या दिवशी पाटील सरांचं टिपण वाचून झाल्यानंतर सायंकाळी मी माझं टिपण सरांना वाचायला दिलं. सरांनी माझं संपूर्ण टिपण काळजीपूर्वक वाचलं. पैकी एक मुद्दा मी मांडू नये असं त्यांनी सुचवलं. याचं कारण हे चर्चासत्र म्हणजे पंच्याहत्तरीनिमित्ताने गोडसेंचा सत्कार कार्यक्रम होता आणि माझ्या या मुद्यात गोडसेंच्या कलामीमांसेवर थोडी कठोर टीका होती. द. ग. गोडसे यांच्या कलामीमांसेवर पुणे विद्यापीठाची पीएच. डी. मिळाल्याचं समजताच सरांचं मला पत्र आलं. त्या पत्रात त्यांनी म्हटलं होतं, ‘‘सुधीर, तू निवडलेला विषय फार किचकट होता. कला समीक्षेची समीक्षा तू करत होतास. खूप अवघड विषयाचं शिवधनुष्य तू पेललंस. यासाठी तुझं त्रिवार अभिनंदन!’’
2004 साली मला पार्ले येथील लोकमान्य सेवा संघाचा मा. सी. पेंढारकर पुरस्कार जाहीर झाला. ‘कला आणि संस्कृती ः एक समन्वय’ या माझ्या पहिल्या समीक्षेच्या पुस्तकासाठी मला हा पुरस्कार मिळाला होता. म. सु. पाटील सरांना हा पुरस्कार याआधी मिळाला होता आणि आपल्यालाही तो मिळतोय म्हणून मला साहजिक आनंद होत होता. 27 फेब्रुवारी 2016 च्या सायंकाळी प्रभादेवीच्या रवींद्र नाटय़ मंदिरात सरांशी माझी शेवटची प्रत्यक्ष भेट झाली. ‘लांबा उगवे आगर’ या त्यांच्या आत्मचरित्रासाठीचा पुरस्कार घेण्यासाठी ते तिथं आले होते आणि मी ‘अहिराणीच्या निमित्तानेः भाषा’ या माझ्या भाषाविषयक पुस्तकासाठीचा ‘नरहर कुरुंदकर भाषा पुरस्कार’ (दोन्ही महाराष्ट्र शासनाचे) घेण्यासाठी सटाण्याहून मुंबईला गेलो होतो.
माझा एक विद्यार्थी मित्र मुंबईला नोकरी करतो. त्याला एकदा सरांकडे मी पाठवलं होतं. सरांशी झालेली चर्चा त्याला इतकी भावली की, तो नेहमी सरांकडे जाऊन काव्यशास्त्र्ाावर चर्चा करू लागला, साहित्यावर बोलू लागला आणि सरांनाही त्याचं त्यांच्याकडे येणं आवडू लागलं. सरांची त्या विद्यार्थ्याशी थोडय़ाच काळात खूप चांगली गट्टी जमली. सरांचा स्वभाव प्रेमळ, निर्मळ, निगर्वी असल्याने कोणीही नवखा माणूस त्यांच्याशी तत्काळ तादात्म्य पावत असे.
पाटील सरांना 2018 चा मानाचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. प्रामुख्याने सर कवितेचे मर्मग्राही समीक्षक म्हणून सर्वत्र विख्यात झाले. काव्यासोबत संतसाहित्य, दलित साहित्याचेही ते मर्मग्रहण करीत असत. जवळ जवळ 50 वर्षांपासून ते मराठी समीक्षा प्रांतात ठळकपणे ओळखलं जाणारं व्यक्तिमत्त्व.
सरांनी 1988 पर्यंत अध्यापन केलं. प्राचार्यपदावरून ते 1989 साली निवृत्त झाले. त्यांची एकूण फक्त 17 पुस्तके प्रकाशित असली तरी ती अक्षर वाङ्मयात गणली जातील अशी आहेत.
2014 आणि 2018 असे दोन साहित्य अकादमी पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत. ‘सर्जन प्रेरणा आणि कवित्व शोध’ या त्यांच्या ग्रंथाला 2018 चा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झाला. समीक्षा क्षेत्रात त्यांच्या कार्याची सर्वदूर म्हणता येईल अशी योग्य दखल नक्कीच घेतली गेली आहे.
कविता म्हणजे काय, कविता का लिहावी, कवितेचे अस्तित्व, कविता आस्वादायची कशी, कवितेची सौंदर्यस्थळे म्हणजे काय, कविता आणि अकविता आदी गोष्टी काव्य प्रकारात शोधण्याचा त्यांना ध्यास होता. त्यांच्याकडून मार्गदर्शन मिळावे म्हणून अनेक नवोदित त्यांच्याकडे सतत येत-जात असत आणि त्यांच्याकडे गेलेले आणि त्यांना अनुसरणारे नवोदित कधीही साहित्य प्रांतात अपयशी ठरले नाहीत.
मराठीत ‘आदिबंधात्मक समीक्षा’ व ‘तृष्णेचे काव्यशास्त्र्ा’ या दोन नवीन संकल्पना मांडण्याचं श्रेय म. सु. पाटील सरांना जातं. प्रा. गंगाधर पाटील आणि डॉ. म. सु. पाटील यांनी मराठी समीक्षेत समीक्षक म्हणून ‘पाटील युग’ सुरू केलं (‘‘कुलकर्णी युग संपलं आणि पाटील युग सुरू झालं’’ असं साहित्य-समीक्षा क्षेत्रात गांभीर्याने म्हटलं जाऊ लागलं. तिसरे समीक्षक रा. ग. जाधव). पाटील सर माणूस म्हणूनही उत्तुंग व्यक्तिमत्त्व होते. त्यांची समीक्षा किचकट, अवजड, अवघड शब्दांची नसून सहजसोपी, सर्जनात्मक आहे. अगदी अलीकडे त्यांनी ‘बदलते काव्य संवेदन’ नावाचा समीक्षा ग्रंथ सिद्ध केला. तो प्रत्येकाने जरूर वाचला पाहिजे.
डॉ. म. सु. पाटील सर आपल्यातून गेले असं अजिबात वाटत नाही. त्यांच्या ग्रंथसंपदेतून ते यापुढेही आपल्याशी हितगुज करत राहणार आहेत हे नक्की.



























































