
सामना प्रतिनिधी । मुंबई
मुंबईत मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू असलेल्या ठिकाणी पाणी साचले होते. मेट्रोसाठी केलेल्या खोदकामामुळे हे पाणी साचले होते. मात्र पाणीउपसा पंपाच्या सहाय्याने त्या पाण्याचा निचरा केला गेल्याचा दावा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) केला आहे.
मुंबईत अनेक ठिकाणी मेट्रो प्रकल्पासाठी खोदकाम करण्यात आले आहे त्या ठिकाणी मंगळवारच्या मुसळधार पावसामुळे पाणी साचले होते. सांत़ाक्रुझ, विद्यानगरी आणि सीप्झ परिसरात कुलाबा-वांद्रे-सीप्झ या भुयारी मेट्रो-3 प्रकल्पाचे काम सुरू असलेल्या ठिकाणी पाणी साचल्याची माहिती एमएमआरडीएने दिली. मात्र आसपासच्या परिसरातील साचलेले पाणी मेट्रोच्या कामाच्या ठिकाणी आणून सोडले गेल्याने हे पाणी साचल्याचा दावा एमएमआरडीएने केला.
साचलेल्या पाण्याचा निचरा पाणीउपसा पंपाच्या सहाय्याने केला गेल्याची माहितीही देण्यात आली. जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड, मजासवाडी, लोखंडवाला ब्रिज आदी ठिकाणी मेट्रोचे काम सुरू असलेल्या ठिकाणीही पाणी साचले होते असे वृत्त आहे.
























































