
सामना ऑनलाईन | चित्रदुर्ग
कर्नाटकमध्ये जमावाने मिळून एका बिबट्याची हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. ही घटना बुधवारी वनाधिकार्यांच्या समोरच घडल्याने वन्य प्राण्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पून्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कर्नाटक राज्यातील चित्रदुर्ग जिल्ह्यात ही घटना घडली असून तेथील जमावाने बिबट्याला चारी बाजूंनी घेरून बिबट्याला जोरदार लाठीने मारहाण केली.
या घटनेवेळी तेथील एका व्यक्तीने या घटनेचा व्हीडीओ रेकॉड केला. मिळालेल्या माहितीनुसार चित्रदुर्ग जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी एका बागेत बिबट्याने दोन स्थानिकांवर हल्ला केला होता. अशी घटना पून्हा घडू नये यासाठी स्थानिकांनी बिबट्याचा शोध घेण्यास सुरूवात केली. अखेर बुधवारी बिबट्या एका झाडावर आढळल्याने जमावाने त्याला खाली उतरविण्यासाठी दगडफेक केली. बिबट्याने झाडावरून उडी घेताच जमावाने बिबट्यावर लाठीने हल्ला केला. वनाधिकार्यांनी या घटनेवेळी लोकांना थांबविण्याचाही प्रयत्न केला परंतु लोक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. अखेर लोकांनी लाठ्या काठ्यांनी मारून त्या बिबट्याचे प्राण घेतले.
असाच प्रकार मे महिन्यात या आधी एका गावात घडला होता. त्यावेळी देखील बिबट्याने हल्ला केल्यामुळे तेथील ग्रामस्थांनी बिबट्याला मारून त्याचे पंजे कापून डोळे देखील काढले होते. मनुष्यावर बिबट्याच्या हल्ल्यांमुळे त्यांची हत्या करण्याचे प्रमाण वाढत आहे. यात बिबट्यांची अमानुष हत्या होत असल्याने वन्य प्राण्यांच्या संरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.





















































