मालाड जलाशयाची दुरुस्ती सुरू, महापौरांनी केली पाहणी; तातडीने काम करण्याचे निर्देश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

मालाड येथील पालिकेच्या जलाशयाची दुरुस्ती तातडीने सुरू करण्याचे निर्देश आज महापौर प्रिं. विश्वनाथ महाडेश्वर यांनी पालिका प्रशासनाला दिले. या पार्श्वभूमीवर या ठिकाणी जलाशयाला काही प्रमाणात पडलेले तडे तातडीने बुजवण्यात येणार असून जलाशयावर वाढलेली छोटी झाडेही तोडण्याचे काम सुरू करणार असल्याचे प्रशासनाने सांगितले.

दिंडोशी परिसरात दुर्घटनेच्या दिवशी तीन तासांत तब्बल 450 मि.मी. पाऊस झाला. मालाड पिंपरीपाडा येथे 1 जुलै रोजी पालिकेच्या टेकडीवरील जलाशयासाठी पायथ्याशी बांधलेली संरक्षक भिंत यामुळे पाण्याचा प्रवाह वाढून भिंतीवर दाब वाढला. यावेळी भूस्खलनही झाल्यामुळे संरक्षक भिंत कोसळल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. मात्र याच वेळी टेकडीवर असलेल्या पालिकेच्या जलाशयाची दुरुस्ती करण्याची गरज असल्याचे समोर आले आहे. याबाबत सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी स्थायी समितीत हा मुद्दा निदर्शनास आणून दिला होता. या पार्श्वभूमीवर महापौर विश्वनाथ महाडेश्वर, सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी जलाशयाच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. यावेळी नगरसेवक ऍड. सुहास वाडकर, तुळशीराम शिंदे, आत्माराम चाचे, मुख्य जलअभियंता अशोककुमार तवाडिया, रमेश देशमुख, संखे यांच्यासह पालिका आधिकारी उपस्थित होते.

मुंबईभरात पालिकेचे 27 जलाशय आहेत. सध्या घडत असलेल्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर आगामी काळात या सर्व जलाशयांची पाहणी करणार असल्याचेही सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी सांगितले.
1980 मध्ये मालाड टेकडी जलाशय बांधण्यात आला. या जलाशयाच्या सुरक्षेबाबत 2017 मध्ये केलेल्या स्ट्रक्चरल ऑडिटनुसार काम सुरू असल्याची माहिती पालिका अधिकाऱयांनी दिली.