मुंबईकरांचा जीव पाण्याच्या भांडय़ात! मंगळवारपासून पाणीकपात रद्द

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। मुंबई

नोव्हेंबर 2018 पासून 10 टक्के पाणीकपातीला सामोरे जाणाऱया मुंबईकरांची येत्या मंगळवारपासून पाणीकपातीमधून सुटका होणार आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱया तलावांत 652728 दशलक्ष लिटर पाणी जमा झाले असून हे पाणी पुढील सहा महिन्यांना पुरणारे आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांत पाणीकपात बंद करण्यात येईल असे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

मुंबईला मोडकसागर, तानसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, तुळशी, विहार व भातसा अशा सात धरणांमधून दररोज 3800 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. या पाणीसाठय़ातून 150 दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा भिवंडी व ठाण्याला दिला जातो. त्यामुळे मुंबईला एकूण 3650 दशलक्ष लिटर पाणीपुरकठा दररोज केला जातो. पावसाळा संपल्यानंतर 1 ऑक्टोबरला तलावातील उपलब्ध पाण्याचा आढावा घेतला जातो. यावेळी सातही तलावात मिळून वर्षभरासाठी 1447363 दशलक्ष लिटर पाणी असणे आवश्यक असते. मात्र या वर्षी 1 ऑक्टोबर 2018 रोजी तब्बल 2 दशलक्ष लिटर पाणीसाठा कमी असल्याचे समोर आले होते. या पार्श्वभूमीवर उपलब्ध पाणीसाठय़ातून पावसाळ्यापर्यंत मुंबईकरांना पुरेशा पाणीपुरवठय़ाचे नियोजन करण्यासाठी पालिकेने नोव्हेंबर 2018 पासून मुंबईत 10 टक्के पाणीकपात सुरू केली आहे. मात्र आता तलावक्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे आता पाणीकपात रद्द करण्यात येणार आहे.

तलावक्षेत्रात होणाऱया समाधानकारक पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा होणाऱया सातही तलावांत सध्या सुमारे 50 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. शिवाय सध्या सुरू असलेल्या पावसामुळे तलाव लवकरच 100 टक्के भरतील अशी आशा आहे. त्यामुळे येत्या एक-दोन दिवसांत मुंबईची पाणीकपात बंद करण्यात येईल. असे पालिका आयुक्त प्रवीण परदेशी,यांनी सांगितले आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणारा नॅशनल पार्कजवळील तुळशी तलाव शुक्रवारी संध्याकाळपासून तुडुंब भरून वाहू लागला आहे. तुळशी तलावाची पाणीसाठा क्षमता 139.17 दलघमी असून तलावात 8046 दशलक्ष लिटर पाणीसाठा जमा झाला आहे.