
सामना प्रतिनिधी । रत्नागिरी
कशेडी घाट बांधणीचे काम हे मुंबई गोवा महामार्गावरील एक वेगळेपण दाखविणारे आहे. कशेडी बोगदा खोदकामाचे 150 मीटरचे काम पूर्ण झाले असून बोगद्याचे काम दिलेल्या मुदतीत पूर्ण करण्यात येईल तसेच मुंबई गोवा महामार्गाचे काम डिसेंबर 2020 पर्यंत पूर्ण होईल असा विश्वास बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला त्यांनी आज मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्याच्या बांधकामाची पाहणी केली.
गेल्या दोन दिवसांत रत्नागिरी व रायगड येथील रस्त्यांची आणि चिपळूण ते वडखळ मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण आणि कशेडी घाटात उभारण्यात येणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण बोगद्याची पहाणी केली. pic.twitter.com/XseHouUPLN
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) July 14, 2019
यावेळी आमदार संजय कदम, उपविभागीय अधिकारी खेड अविनाश सोनाने उपस्थित होते. यावेळी बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाची पाहणी देखील त्यांनी केली.
गणेशोत्सवात कोकणात येणार्या चाकरमान्यांचा मुंबई गोवा महामार्गावरुन होणारा प्रवास सुखकर होईल याची पूर्ण दक्षता घेण्यात येईल असेही पाटील यांनी सांगितले. ज्या ठिकाणी पावसामुळे रस्त्याला भेगा गेल्या आहेत अथवा रस्ता नादुरुस्त झाला आहे अशा ठिकाणी दुरुस्तीची कामे अथवा गरज भासल्यास तो रस्ता नवीन केला जाईल अशी माहिती पाटील यांनी दिली.




























































