
सामना ऑनलाईन । मुंबई
डोंगरी इमारत दुर्घटनेत 13 जणांना जीव गमवावा लागल्याची गंभीर दखल घेत पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी बी वॉर्डचे प्रभारी सहायक आयुक्त विवेक राही यांना निलंबित केले आहे. स्थायी समितीत याप्रकरणी शिवसेनेसह सर्वपक्षीयांनी प्रशासनाला धारेवर धरल्याच्या पार्श्वभूमीवर स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी सहायक आयुक्तांचे निलंबन करा असे निर्देश दिले होते.
महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनीही घटनास्थळी भेट देऊन संबंधित दुर्घटनेची चौकशी करण्याचे आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले होते. बी वॉर्डचे सहायक आयुक्त यांच्या दुर्लक्षामुळे दुर्घटना घडल्याचा आरोप स्थायी समितीत करण्यात आला होता. बी वॉर्डमध्ये बेकायदा बांधकाम करणाऱ्याचे रॅकेट सुरू असल्याचे सांगत पालिका आयुक्तांनी कठोर कारवाई करावी असे निर्देश यशवंत जाधव यांनी दिले होते. यावेळी शिवसेनेसह सर्व पक्षाच्या नगरसेवकांनी बी, सी आणि डी वॉर्डमध्ये बेकायदा बांधकामे राजरोसपणे सुरू असून या विभागांचे डिझास्टर ऑडिट करण्याची मागणीही केली होती.



























































