कोळंब पुलाच्या समस्या कायम: प्रवाह अडवलेला मातीचा भराव खाडीपात्रातच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मालवण

तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मालवण-देवगड मार्गावरील धोकादायक कोळंब पूल दुरुस्त झाला. पुलावरून एसटी बस व अन्य वाहतूक सुरू झाली. मात्र पुलाची दुरुस्ती खरच पूर्ण झाली आहे का? असा सवाल पुलाची दुरुस्ती व पुलाखालील परिस्थिती पाहून उपस्थित केला जात आहे. दरम्यान, पुलाखाली टाकण्यात आलेला दगड मातीचा भराव अद्यापही काढण्यात न आल्याने खाडीपात्रातील पाण्याच्या प्रवाहास निर्माण झालेला अडथळा पावसात अधिकच वाढला आहे. तर पुलाच्या जीर्ण व गंजलेल्या लोखंडी शिगा पाण्यातच टाकण्यात आल्या आहेत. मालवणच्या दिशेने असलेली संरक्षक भिंतही कोसळली असून ती उभारण्याची कार्यवाही झालेली नाही. यासह अन्य समस्या असून ग्रामस्थ व वाहनचालकातून नाराजी व्यक्त केली जात आहे.

जीर्ण झालेल्या कोळंब पुलाच्या आतील शिगा गंजून गेल्याने कमकुवत बनलेले पूल वाहतुकीस धोकादायक बनल्याने दोन वर्षांपासून पुलावरून एसटी व अन्य अवजड वाहतूक बंद होती. पूल दुरुस्तीसाठी सुरवातीला ४ कोटी निधी मंजूर झाला. मात्र त्यानंतर जादा दुरुस्तीसाठी पुन्हा ४ कोटी असा सुमारे ८ ते साडेआठ कोटी निधी पूल दुरुस्तीसाठी मंजूर झाला. त्यानंतर सतत मुदतवाढ घेत ठेकेदाराकडून पूल दुरुस्ती सुरू होती. पूल दुरुस्ती कामाबाबत सातत्याने तक्रारी होत होत्या. एकदा तर बांधकामावर खाडीतील खारे पाणी मारताना ग्रामस्थांनी ठेकेदार कामगारांना रंगेहात पकडले. मात्र कोणतीही कारवाई झाली नाही.

दुरुस्ती दरम्यान पूल बंद असल्याने कोणतीही पर्यायी वाहतूक व्यवस्था करण्यात आली नाही. त्यामुळे ग्रामस्थ संतप्त बनले. मात्र पर्यायी व्यवस्था करण्यात बांधकाम विभाग, ठेकेदार यांना अपयश आले.

पूल दुरुस्तीच्या मुदतवाढीची डेडलाईन संपल्यानंतर आमदार वैभव नाईक यांच्या आग्रहाने याच महिन्यात पुलावरून एसटी वाहतूक सुरू झाली. मात्र बांधकाम विभागाने पुलाच्या केलेल्या तपासणीत पूलावरून २० टन वाहतुकीसच परवानगी मिळाली. त्यामुळे अति अवजड वाहतूक जादा क्षमतेचे डंपर ट्रक पुलावरून जाऊ शकणार नाही. त्यामुळे जर आठ कोटी दुरुस्तीसाठी खर्च करून पुलावरून मर्यादित स्वरूपात वाहतूक होणारअसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

पुल दुरुस्तीचे ऑडिट व्हावे – आमदार नाईक
पूल दुरुस्त झाला असे सांगितले जात असले तरी पुलाची झालेली दुरुस्ती पाहता दर्जाबाबत अनेक सवाल उपस्थित होत आहेत. पुलाच्या दोन्ही बाजूकडील पिलरच्या शिगा आजही गंजलेल्या स्थितीत आहेत. पुलाच्या दोन्ही मार्गाना जोडणारा रस्ता खड्डेमय आहे. अशी बहुतांश कामे अपूर्ण असताना पूल दुरुस्त झाला. याबाबत सवाल उपस्थित होत आहेत. आमदार नाईक यांनी पुलाच्या कामाचे ऑडिट करावे. असे पत्र बांधकाम मंत्र्यांकडे दिले आहे. तरी पुलाची रखडलेली कामे तात्काळ पूर्ण व्हावीत. तसेच रखडलेल्या कामाना जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई व्हावी अशी मागणी केली जात आहे.