
>> विद्या कुलकर्णी
हा युरोपियन गोरा साहेब. हिवाळय़ात मात्र आपल्या मुंबईत मुक्कामी असतो.
पाश्चमात्य देशातील उंचापुरा, गोरापान सुटाबुटातील माणसाला पहिले की आपण जसे एकदम प्रभावित होतो तसे काहीसे मला या ‘शुभ्र गोऱया व काळ्या’ रंगातील पक्ष्याबद्दल म्हणावेसे वाटते!! या पक्ष्याचा रुबाब काही औरच आहे. चोचीवर चोच टेकवून नर मादींची प्रेम करण्याची पद्धतही मजेशीरच आहे.
शेकाटय़ा अवोसेट व स्टील्ट कुटुंबातले लांब पायाचे पक्षी असून युरोप, आफ्रिका, आशिया, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड येथे आढळतात. हिवाळ्यात हिंदुस्थान, बर्मा, आणि सिलोन येथे आढळतात. थंड प्रदेशात प्रजनन करणारे शेकाटे पक्षी ऑगस्ट ते नोव्हेंबरदरम्यान दक्षिणेच्या दिशेने खूप लांबवर स्थलांतर करतात व मार्च-एप्रिलमध्ये मूळ ठिकाणी परत येतात. समशीतोष्ण, उप-उष्णकटिबंधीय आणि उष्णकटिबंधीय पर्वतरांगांमध्ये असलेले शेकाटे पक्षी बहुधा स्थानिक असून प्रजननाच्या वेळी जवळपासच जातात. हे पक्षी समूहाने रात्रीच्या वेळी प्रवास करतात, परंतु अंधारात एकमेकांना पाहू शकत नाहीत. म्हणूनच थव्यातला प्रत्येक पक्षी पिपाणीसारखा आवाज काढून आपले स्थान सांगतो.
पाय पातळ-काठीसारखे लांब व लालसर-गुलाबी रंगाचे असतात. पाय त्यांच्या उंचीच्या साठ टक्के असतात. चोच लांब, सरळ, पातळ व काळ्या रंगाची असते. शरीराचा वरील भाग काळसर असून उर्वरित भाग पांढराशुभ्र असतो. हिवाळा ऋतू सोडून नराच्या डोक्यावर व मानेवर काळ्या रंगाचा शिडकावा असतो. मादीच्या डोक्यावर कमी भागावर काळा रंग असतो. नराच्या काळ्या पाठीवर हिरव्या रंगाची झाक असते तर मादीच्या पाठीवर तपकिरी रंगाची छटा असते. किशोरवयीन पक्षी राखाडी रंगाचे असून पंखांवर वाळूच्या रंगाची छटा व पिसांची टोकं पांढरट असतात. त्यामुळे हवेत उडत असताना पांढऱया रंगाची रेशच दिसते.
हे पक्षी कळपात राहणारे असून सामान्यतः लहान गटांमध्ये मध्ये आढळतात. ताज्या पाण्याचे साठे, खाऱया पाण्याच्या दलदलीच्या जागा, उथळ तलावाच्या ठिकाणी व नदीजवळ या पक्ष्यांचे वास्तव्य असते. या पक्ष्याचे जमिनीवरील चालणे, धावणे अतिशय डौलदार असते. वेळ पडल्यास हे उत्तम रीतीने पाण्यात पोहू शकतात. त्यांचे उड्डाण मात्र कमकुवत व झोपेत उडाल्यापमाणे असते. उडताना लांबलचक पाय शेपटीच्या मागे सरळ असतात. हे पक्षी उंच स्वरात वारंवार साद घालतात.
या पक्ष्यांचा आहार हंगामानुसार बदलतो. प्रामुख्याने त्यांचे खाद्य पाण्यातील किडे, गोगलगायी, कालव यांच्यासारखे कठीण कवचाचे जलचर, अळया, पाणकीटक, छोटे बेडूक, छोटे मासे व त्यांची अंडी, बियाणे असे असते. हे पक्षी सकाळीच लगबगीने खाद्य शोधण्यासाठी बाहेर पडतात. लांब पायांमुळे व निमुळत्या चोचीमुळे त्यांना खोल पाण्यातून, चिखलातून इतर पाणथळी पक्ष्यांपेक्षा खाद्य शोधणे सोपे जाते. त्यामुळे खाण्याकरिता होणारी स्पर्धाही कमी होते. हे पक्षी दुपारच्या उन्हामध्ये एक पाय दुमडून विश्रांती घेतात!
या पक्ष्यांचा प्रजननाचा काळ एप्रिल ते ऑगस्ट असून या काळात कधी कधी 100 च्या संख्यने एकत्र आलेले दिसतात. त्यांचे घरटे पाण्याजवळ जमिनीवर पोकळीत, छोटय़ाशा खड्डय़ात किंवा पालापाचोळ्याच्या ढिगाऱयात असते. नर व मादी दोघेही मिळून घरटे तयार करतात. मादी एकावेळी फिक्कट रंगाची व त्यावर काळ्या रंगाचे धब्बे असलेली 3 ते 4 अंडी देते. नर व मादी मिळून 23 ते 26 दिवस अंडी उबवतात. अंडी उबवण्यासाठी व पिल्लांचे संगोपन करण्यासाठी बरेच कष्ट घेतात.
या पक्ष्यांचे आयुष्यमान साधारण नऊ वर्षे असते.
या पक्ष्यांचे फोटो मी भांडुप-मुंबई, नळ सरोवर, भिगवण येथील पाणथळी जागेत काढले आहेत. या पक्ष्यांचा स्वभाव लाजरा-बुजरा असल्यामुळे त्यांच्या नकळतच मला फोटो काढायला लागले. नळ सरोवर येथे मात्र उडणाऱया शेकाटय़ाचे फोटो काढताना वेगळाच आनंद मिळाला.






















































