
सामना प्रतिनिधी, मुंबई
मुंबईसह मुंबईच्या दोन्ही उपनगरांत तसेच ठाणे, पालघर आणि कोकणात व इतर काही जिह्यांत पावसाने हाहाकार उडवला असला तरी अजूनही गोंदिया, भंडारा, परभणी, हिंगोली, धाराशीव आदी अकरा जिह्यांत अजूनही अपुऱया पावसाची नोंद झाली आहे. राज्यात एकीकडे ओला दुष्काळ तर दुसरीकडे सुक्या दुष्काळाचे सावट असे चित्र अकरा जिह्यांत दिसत आहे. कारण राज्यातल्या काही भागांत पाण्याची तहान भागवण्यासाठी 4 हजार 293 टँकर धावत आहेत. सुदैवाने राज्यातल्या धरणांतील पाणीसाठा वाढून 55 टक्क्यांवर आला आहे.
मुंबईसह आसपासच्या भागात तुफान पाऊस होत आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणारी धरणे दुथडी भरून वाहू लागली आहेत. काही भागांत ओला दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असली तरी गोंदिया, भंडारा, वाशीम, हिंगोली, यवतमाळ, परभणी, नांदेड, बीड, लातूर, सोलापूर आणि धाराशीव या जिह्यांत अजून अपुरा पाऊस आहे. या जिह्यांमध्ये सरासरी 20 ते 59 टक्के फक्त पावसाची नोंद झाली आहे याकडे राज्याच्या मदत व पुनर्वसन विभागातील अधिकाऱ्याने लक्ष वेधले. राज्याच्या काही भागांत अजूनही पुरेसा पाऊस झाला नाही त्यामुळे दुष्काळाचे सावट कायम असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
धरणांतील पाणीसाठा वाढला
राज्यातल्या धरणांतील पाणीसाठय़ामध्ये वाढ झाल्याचे जलसंपदा विभागातील अधिकाऱयाने सांगितले. जून महिन्यात राज्यातल्या धरणांतील साठा 27 टक्क्यांपर्यंत खाली आला होता. त्यामुळे जलसंपदा विभागात चिंतेचे वातावरण होते. पण मागील काही दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणांतील पाणीसाठा 55.32 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. त्यामुळे आनंदाचे वातावरण निर्माण होत आहे. पुढील एक-दीड महिन्यात होणाऱया पावसानंतर धरणांतील पाणीसाठय़ात वाढ होईल अशी अपेक्षा जलसंपदा विभागातील अधिकाऱयांनी व्यक्त केली.
4 हजार 293 टँकर
राज्यातील नद्या आणि विहिरी दुथडी भरून वाहू लागल्य आहेत, पण सध्याच्या घडीला राज्यातल्या अनेक वाडय़ा-वस्त्यांवर टँकरनी पिण्याचा पाणीपुरवठा होत आहे. सध्याच्या घडीला 4 हजार 293 टँकरच्या सहाय्याने पाणीपुरवठा होत आहे. संभाजीनगरमध्ये 330, जालना 356, बीड 699, धाराशीव 222, लातूर 105, बुलढाणा 105 तर नगरमध्ये 682 टँकरच्या सहाय्याने पाणीपुरवठा होत आहे अशी माहिती पाणीपुरवठा विभागातील सूत्रांनी दिली.



























































