मोटरमनच्या केबिनवरच सीसीटीव्हीचा पहारा! दगडफेकीच्या वाढत्या घटनांमुळे निर्णय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

रेल्वेवर दगड फेकण्याच्या वाढत्या प्रकारांना आळा घालण्यासाठी लोकलमधील मोटरमन केबिनला सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्याची मध्य रेल्वे सुरक्षा दलाने योजना आखली आहे. या क्षेत्रातील तज्ञ कंपन्यांशी यासंदर्भात बोलणी केली जात आहेत.

दगडफेकीच्या घटनांबरोबरच लोकलच्या दरवाजात उभे राहिलेल्या प्रवाशांच्या हातावर फटका मारून मोबाईल किंवा बॅग लंपास करण्याचेही गुन्हे घडत आहेत. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. त्याची किमान एक महिना चाचणी केली जाईल व त्यानंतर अंतिम निर्णय होईल. रेल्वेच्या हद्दीत येणारा आजूबाजूचा परिसर कॅमेऱयात कुठपर्यंत कैद होऊ शकतो, अन्य तांत्रिक समस्या उद्भवू शकते का या बाबी तपासून अंतिम निर्णय होणार असल्याचे मध्य रेल्वे आरपीएफचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त अशरफ के. के. यांनी स्पष्ट केले.

56 ठिकाणे असुरक्षित
लोकलवर फटका गँग हल्ला, दगडफेक, रूळ ओलांडण्याच्या घटनांना रोखण्यासाठी पोलिसांनी अशा 56 असुरक्षित ठिकाणांची यादीच बनवली आहे. या ठिकाणांवर लोहमार्ग पोलिसांकडून कर्मचाऱयांना तैनात केले जात असून आरपीएफकडून त्याचे नियोजन केले जात असल्याचे अश्रफ यांनी सांगितले.