
सामना प्रतिनिधी । राहुरी
मुळा धरणातील पाणी 500 दशलक्ष घनफुट झाल्याने गुरूवारी सायंकाळी आमदार शिवाजी कर्डीले यांच्या हस्ते धरणावरील मोटरपंपाची कळ दाबुन मुळा नदीपात्रात 4 हजार क्युसेकने पाणी सोडण्यात आले. मुळा नदीपात्रात पाणी झेपावताच उपस्थित शेतकरी तसेच पाणी पाहण्यासाठी आलेल्या राहुरीकरांनी जल्लोष केला. राहुरी तालुका विकास मंडळाचे अध्यक्ष रावसाहेब यादवराव तनपुरे यांच्या हस्ते जलपुजन करण्यात आले. धरणातून 4 हजार क्युसेकने मुळा नदीपात्रात पाणी सोडण्यात आले. या पाण्यामुळे नदीकाठच्या विहीरींची पाणी पातळी वाढण्यासोबतच शेतीला दिलासा मिळणार आहे. मुळा नदीपात्रात पाणी सोडण्यात आल्याने नदीकाठच्या शेतकर्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. धरणाचा पाणीसाठा वाढविण्याबरोबरच नदीपात्रात पाणी सोडण्याचा आज गुरूवार पासुन सुरू झालेला हा कार्यक्रम शेतकर्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरला आहे.
गेल्या 12 दिवसांपासुन कोतुळ कडुन मुळा धरणात पाण्याची समाधानकारक आवक सुरू असल्याने राहुरी, नगर, पाथर्डी, शेवगाव या मुळा धरणाच्या लाभक्षेत्रासाठी मुळा उजवा व डावा कालव्यातुन पाणी सोडण्याची मागणी लाभधारक शेतकर्यांकडुन झाल्याने मंगळवारी सायंकाळी उजवा व डावा कालव्यातुन पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले आहे. या पाठोपाठ आज नदीपात्रात पाणी सोडण्यात आले आहे. डावा कालव्याच्या आवर्तनात मुसळवाडी तलाव भरला जाणार असल्याने तलावावर अवलंबून असलेल्या 9 गावांचा पाणी प्रश्न सुटण्यास मदत झाली आहे. राहुरी, नगर, पाथर्डी या तालुक्यातील जिराईत भागाला संजीवनी ठरलेल्या वांबोरी चारीला पाणी सोडण्याच्या दृष्टीने पंपाचे थकीत वीज बीलापैकी टंचाई निवारणातुन बुधवारी 60 लाख रुपये भरण्यात आल्याने लवकरच वांबोरी चारीला पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती मुळा जलसंपदा प्रशासनाकडुन मिळाली.



























































