
सामना ऑनलाईन, नवी दिल्ली
काँग्रेसचा नवा अध्यक्ष निवडण्यासाठी काँग्रेसच्या वर्किंग कमिटीची दिल्लीत बैठक झाली. नवा अध्यक्ष निवडण्यासाठी सकाळी झालेल्या चर्चेनंतर रात्री 8.30 ला पुन्हा काँग्रेस नेते भेटणार आहे. रात्री 9 वाजेपर्यंत नाव निश्चित होईल असं काँग्रेसचे लोकसभेतील गटनेते अधीर रंजन चौधरी यांनी सांगितले आहे. नवे नाव निवडण्यासाठी जरी ही बैठक बोलावली असली तरी बैठकीतल्या काही नेत्यांनी राहुल गांधी यांनीच अध्यक्ष बनावे असा हट्टच धरला होता. ‘तुमच्याशिवाय पक्ष कसा चालणार असे’ उद्गार बैठकीतल्या एका नेत्याने काढल्याचे समजते आहे. राहुल गांधी यांनी आपण अध्यक्षपद पुन्हा स्वीकारणार नसल्याचे सांगितले आहे. राहुल गांधी तसेच सोनिया गांधी या दोघांनीही नव्या अध्यक्षाच्या निवड प्रक्रियेपासून आपण दूर राहणार असल्याचंही या बैठकीत सांगितले.
लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. यामुळे निर्माण झालेला तिढा सोडविण्यासाठी काँग्रेसच्या वर्किंग कमिटीची महत्त्वाची बैठक शनिवारी नवी दिल्लीत सुरू झाली. यामध्ये काँग्रेसच्या नव्या अध्यक्षांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता असून मुकुल वासनिक, मल्लिकार्जुन खरगे यांची नावे आघाडीवर आहेत.
























































