
>> प्रदीप म्हात्रे
सैद्धांतिक भौतिकी संशोधनात मोलाची कामगिरी बजावणारे मराठमोळे शास्त्रज्ञ डॉ. अतिश दाभोलकर यांची इटलीतील आंतरराष्ट्रीय सैद्धांतिक भौतिकी संशोधन संस्थेच्या संचालकपदासाठी निवड झाली आहे. ‘अशा संस्थेचे नेतृत्व करण्याची संधी आयुष्यात एकदाच मिळते आणि ती डॉ. दाभोलकर यांच्यासारख्या योग्य व्यक्तीला मिळत असल्याचा मला आनंद आहे’, हे मावळते संचालक फर्नांडो क्वेवेडो यांचे उद्गार डॉ. अतिश यांच्या कर्तृत्वाची पोचपावती म्हणावी लागेल. आंतरराष्ट्रीय सैद्धांतिक भौतिकी संशोधन क्षेत्रात त्यांच्या नियुक्तीच्या रूपाने मराठी मोहरच उमटली आहे.
इटलीतील आंतरराष्ट्रीय सैद्धांतिक भौतिकी संशोधन संस्थेच्या (इंटरनॅशनल सेंटर फॉर थिऑरॉटिकल फिजिक्स-आय.सी.टी.पी.) संचालकपदाकरिता डॉ. अतिश दाभोलकर यांची अलीकडेच निवड जाहीर झाली. त्यामुळे एका मराठमोळय़ा शास्त्रज्ञाच्या शिरपेचात एक नवा तुरा रोवला गेला आहे. हे पद सहाय्यक महासंचालक, युनेस्को या दर्जाचे असून त्याचा कार्यकाल पाच वर्षांचा आहे. त्यावरूनही डॉ. अतिश यांच्या कामगिरीची कल्पना येऊ शकत.s
आय.सी.टी.पी. या संस्थेबद्दल सांगायचं तर नोबेल पारितोषिक विजेते अब्दुस सलाम यांनी ती पन्नास वर्षांपूर्वी स्थापन केली असून इटालियन सरकार, युनेस्को आणि इंटरनॅशनल ऑटोमिक एनर्जी एजन्सी या त्रिपक्षीय करारानुसार संस्थेचं कार्य चालतं आणि संस्थेच्या सुकाणू समितीवर वरील तीन संस्थांचे प्रतिनिधी असतात. संस्थेचं उद्दिष्ट अत्युच्च दर्जाचं वैज्ञानिक संशोधन आणि त्यातून जगभरात वैज्ञानिक क्षमता विकसित करून आंतरराष्ट्रीय पातळीवर सांमजस्य आणि सहकार्य वाढवणं हा आहे. ज्या संशोधकांना पुरेशी संधी मिळत नाही, अशांना संधी उपलब्ध करून देण्याचं काम ही संस्था करते. जगाच्या कानाकोपऱयातून विकसित आणि विकसनशील देशांतून 6000 शास्त्रज्ञ दरवर्षी या संस्थेत येतात आणि किमान 60 कार्यशाळांचा लाभ घेतात.
या माध्यमातून आपापसांमध्ये विचारांची देवाण–घेवाण होते आणि विज्ञान संशोधनाकरिता योग्य दिशा मिळते. शिवाय त्यायोगे आंतरराष्ट्रीय सहकार्याला चालना मिळते. बऱयाचदा आपापसात संघर्ष सुरू असणाऱया देशातील वैज्ञानिकही यानिमित्ताने एकत्र येतात. अशा संस्थेत संचालक म्हणून डॉ. अतिश आता काम पाहणार आहेत. 16 सप्टेंबर 1963 साली जन्मलेल्या अतिश दाभोळकर यांचे शालेय शिक्षण कोल्हापूर जिह्यातील गारगोटी येथे झाले. वडील प्रा. श्रीपाद दाभोलकर (गणिताचे प्राध्यापक) आणि आई वृंदा यांचा समर्थ वारसा त्यांना लाभला. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्वर्यू डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि श्रीराम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडस्ट्रियल रिसर्चचे माजी संचालक डॉ. दत्तप्रसाद दाभोलकर हे त्यांचे काका. पुढे अतिश यांनी आय.आय.टी. कानपूर येथून पदवी प्राप्त करत 1990 साली प्रिन्सटन विद्यापीठातून प्रा. जेफ्री हार्वे यांच्या मार्गदर्शनाखाली सैद्धांतिक भौतिकीत पीएच.डी. मिळवली. त्यानंतर रूटगर्स, हार्वर्ड येथे पीएच.डी. पश्चात संशोधन करत पुढील दोन वर्षे कॅलिफोर्निया इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे सीनियर रिसर्च फेलो म्हणून काम पाहिले.
त्यानंतर त्यांनी हिंदुस्थानात येणं पसंत केलं आणि 1996 ते 2010 या कालावधीत ते टाटा मूलभूत संशोधन संस्थेत सैद्धांतिक भौतिकीचे प्राध्यापक होते. डॉ. अतिश यांच्या संशोधनाने स्टीफन हॉकिंग इतके प्रभावित झाले की, त्यांनी स्वतः कॅलिफोर्निया येथे जाऊन डॉ. अतिश यांची भेट घेतली. डॉ. अतिश दाभोलकर यांनी मुंबईत ‘स्ट्रिंग थिअरी’वर परिषद आयोजित करून त्याकरिता खुद्द स्टीफन हॉकिंग स्वतः हजर होते आणि त्याचा लाभ सर्वसामान्य विज्ञानप्रेमींनी घेतला होता. डॉ. अतिश दाभोलकर स्टॅनफोर्ड विद्यापीठाचे अतिथी प्राध्यापक असून ‘सर्न’ या युरोपीय अणुकेंद्रीय संशोधन संस्थेचे ते अतिथी वैज्ञानिक आहेत. त्यांचे संशोधन पुंज कृष्णविवरं आणि स्ट्रिंग थिअरी संबंधित असून त्याकरिता 2006 मध्ये शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार मिळाला आहे. भारतीय विज्ञान अकादमीचे ते निर्वाचित सभासद असून फ्रान्स येथील नॅशनल रिसर्च एजन्सीचे अध्यासन त्यांना 2007 मध्ये प्राप्त झाले होते. 2008 मध्ये त्यांना ‘नॅशनल लीडरशिप पुरस्कार’ देण्यात आला होता.
आता ते आंतरराष्ट्रीय सैद्धांतिक भौतिक संशोधन संस्थेचे (आय.सी.टी.पी.) विद्यमान संचालक फर्नांडो क्वेवेडो यांच्याकडून नोव्हेंबर 2019 मध्ये पदभार स्वीकारतील. ‘आय.सी.टी.पी.चं वेगळेपण तिच्या उद्दिष्टांमध्ये असल्यामुळे विकसनशील देशांमध्ये या संस्थेचा एक चांगला प्रभाव आहे. अशा संस्थेचं नेतृत्व करण्याची संधी आयुष्यात एकदाच येते आणि ही संधी डॉ. अतिश दाभोलकरांसारख्या योग्य व्यक्तीला मिळत आहे याचा मला आनंद आहे’ हे मावळते संचालक फर्नांडो क्वेवेडो यांचं विधान डॉ. अतिश यांच्या कार्यकर्तृत्वाबद्दल पुरेसे सूचक आहे.
आय.सी.टी.पी.सारख्या विश्वविख्यात संस्थेचे नेतृत्व करण्याची संधी मिळणे, हा एक मोठा सन्मान असून त्याबरोबरच मोठी जबाबदारीही असल्याची डॉ. दाभोलकर यांची धारणा असून जागतिक स्तरावर उच्च दर्जाचे संशोधन व्हावे आणि त्याकरिता विज्ञानातील बदलते वास्तव आणि दिशा लक्षात घेऊन त्याप्रमाणे पुढील वाटचाल करण्याचा त्यांचा मानस आहे.



























































