पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शिवसेना सज्ज! धान्य, कपडे, वैद्यकीय मदतीसह ट्रक निघाले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शिवसेना सज्ज झाली आहे. धान्य, कपडे, औषधे, डॉक्टर्स, चादरी, ब्लँकेटस्सह दैनंदिन जीवनातील आवश्यक वस्तूंनी भरलेले ट्रक, रुग्णवाहिका घेऊन शिवसेनेची मदत पथके आज मुंबईतून रवाना झाली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या निर्देशानुसार शिवाजी पार्क येथून ही पथके महाड, वसई, पाटण, कराडच्या दिशेने रवाना झाली.

महाराष्ट्रातील 10 जिल्हे, 64 तालुक्यांत पुराने हाहाकार माजवला आहे. पुराच्या पाण्यामुळे अनेक ठिकाणी मदत पोहोचवणेही शक्य होत नाही. अशा परिस्थितीत पहिल्यांदा ज्या ठिकाणी पूर ओसरला आहे अशा ठिकाणी तातडीची मदत पोहोचविण्यासाठी शिवसेनेची पथके आज रवाना झाली. याविषयीची माहिती शिवसेना नेते-उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली. सुभाष देसाई म्हणाले, जनतेचा त्रास कमी व्हावा हा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आवश्यक असलेली सर्व मदत शिवसेनेच्या माध्यमातून करण्यात येत आहे. आज एक तुकडी मुंबईतून रवाना होत आहे. याआधी स्थानिक पातळीवरही शिवसेनेने मदतकार्य सुरूच केलेले आहे. शिवसेनेच्या मदतकार्यात समाजातील दानशूर व्यक्ती तसेच कंपन्यांकडूनही हातभार लावला जात आहे. जे जिल्हे आणि तालुके प्रभावित आहेत त्या सर्व ठिकाणी मदत पोहोचवणे आवश्यक आहे. अद्यापही सांगली, कोल्हापूर भागातील पूर ओसरला नाही. इथे पूर ओसरल्याबरोबर शिवसेनेची मदत पथके तिथे पोहोचतील, असे त्यांनी सांगितले.

वैद्यकीय मदतीवर भर
पूर ओसरल्यानंतर या ठिकाणी रोगराई पसरण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे 100 डॉक्टरांची टीमच शिवसेनेच्या वतीने पूरग्रस्त भागात पाठविण्यात आली आहे. मदतीचे संकलन करण्यासाठी शिवसेना भवन येथे नियंत्रण कक्ष उभारण्यात आला आहे. इथेही मदतीचा ओघ सुरू असून इच्छुकांनी व्हॉटस्ऍप क्र. 8104864460 व्हॉइस कॉलसाठी 9324322909 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.