महाराष्ट्रालाही केंद्राने मदत द्यावी, आदित्य ठाकरे यांची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुराचे संकट हे राष्ट्रीय आहे. देशात कुठेही संकटे आली तरी मदतीसाठी महाराष्ट्र नेहमीच पुढे असतो. इतर राज्यांसारखी महाराष्ट्रालाही केंद्र सरकारकडून मदत द्यावी, अशी मागणी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी ईश्वरपूर येथे पत्रकारांशी बोलताना केली. आदित्य ठाकरे यांनी आज सांगली आणि सातारा जिह्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी केली. ब्रह्मनाळ येथील पुरात बोट उलटून मयत झालेल्या सात कुटुंबीयांना प्रत्येकी एक लाख रुपयांची रोख मदत शिवसेनेच्या वतीने देण्यात आली. अंकली, हरिपूर, सांगली, नांद्रे, ब्रह्मनाळ, भिलवडी, शिरगाव, वाळवा, कराड येथील पूरग्रस्तांची आस्थेवाईकपणे चौकशी करत मदतीचा हात दिला. आपुलकीने मायेचा हात खाद्यांवर टाकून त्यांनी पूरग्रस्तांमध्ये विश्वास निर्माण केला.

जिल्हाधिकाऱयांना फोन… आणि आजपासून पंचनामे
सांगली शहरातील मुख्य बाजारपेठांचे या महापुरात प्रचंड नुकसान झाले. व्यापारी संकुलाचे अद्याप पंचनामे झालेले नाहीत, असे व्यापाऱयांनी सांगताच आदित्य ठाकरे यांनी थेट जिल्हाधिकाऱयांना फोन लावला. व्यापाऱयांची भावना सांगितल्या. उद्या, 22 ऑगस्टपासून या भागातील पंचनामे सुरू करण्यात येतील, असे स्पष्ट आश्वासन जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिले. व्यापाऱयांना ही माहिती देताच व्यापाऱयांनी समाधान व्यक्त करीत आदित्य ठाकरे यांचे आभार मानले. सार्वजनिक बांधकाममंत्री, आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे, कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष तथा सांगली जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. नितीन बानुगडे-पाटील, खासदार राजन विचारे आदी यावेळी उपस्थित होते.

मृतांच्या कुटुंबीयांना रोख मदत
महापुरात बोट उलटून 17 जण मृत्युमुखी पडलेल्या ब्रह्मनाळ या गावी आदित्य ठाकरे यांनी भेट दिली. गावकऱयांशी संवाद साधून दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. प्रत्येक कुटुंबीयांना मदतीचा हात म्हणून शिवसेनेच्या वतीने एक लाख रुपयांची रोख मदत देण्यात आली. तर ब्रह्मनाळ हायस्कूल येथे महिला-भगिनींशी संवाद साधून मदतीचे वाटप केले.

आमीरची 25 तर लता मंगेशकर यांची 11 लाख रुपयांची मदत
राज्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी बिग बी अमिताभ बच्चन यांनी 51 लाख रुपयांची मदत जाहीर केल्यानंतर आता गानसम्राज्ञी लता मंगेशकर आणि आमीर खान हेदेखील पुढे सरसावले आहेत. आमीर खानने 25 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. तर गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी 11 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. ही मदत त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिली असून मुख्यमंत्र्यांनी या दोघांचेही ट्विटरवरून आभार मानले आहेत.

दहिसरमधील संस्कार प्रतिष्ठान बेघरांचे पुनर्वसन करणार
संस्कार प्रतिष्ठानच्या वतीने यंदा दहिसरच्या मानाच्या दहीहंडीच्या माध्यमातून पूरग्रस्तांना मदत करण्यात येणार आहे. बेघर झालेल्यांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. शनिवार, 24 ऑगस्ट रोजी दहिसर स्पोर्टस् फाऊंडेशन, विद्यामंदिर शाळेसमोर सकाळी 11 वाजता होणाऱया कार्यक्रमात पूरग्रस्त भागांतील बेघर झालेले कुटुंबीय उपस्थित राहणार आहे. पूरग्रस्तांना मदतीचा हात म्हणून शिवसेना उपनेते, म्हाडा उपसभापती विनोद घोसाळकर यांच्या हस्ते या भागातील कुटुंबीयांना मदत केली जाणार आहे. सांगली पलूस येथील सुरेखा शहाजी सूर्यवंशी यांचे राहते घर पाण्यात वाहून गेले. त्यामुळे त्यांच्या मुलीचे शिक्षण थांबले. तर कोल्हापुरातील सत्यप्पा अतवाडकर, राजू कुरी हेदेखील बेघर झाले. त्यांचे पुनर्वसन प्रतिष्ठान करणार आहे. यावेळी विभागप्रमुख-आमदार विलास पोतनीस, महिला आघाडी संघटक सुजाता शिंगाडे, उपविभाग संघटक शकुंतला शेलार, भालचंद्र म्हात्रे, कार्यक्रमाचे आयोजक नगरसेविका तेजस्वी घोसाळकर, मुंबै बँकेचे संचालक अभिषेक घोसाळकर उपस्थित राहणार आहेत.

राज्य बँक दोन पूरग्रस्त गावांचे पुनर्वसन करणार
राज्यातील सहकारी बँकांची शिखर बँक अशी ओळख असलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. त्यानुसार सांगली आणि कोल्हापूर जिह्यातील दोन पूरग्रस्त गावांचे पुनर्वसन करण्याची जबाबदारी खांद्यावर घेण्याचा निर्णय बँकेने घेतला आहे. पडझड झालेल्या घरांची दुरुस्ती, घर पडलेल्या कुटुंबाला नवीन घर बांधून देणे आदी कामे करण्यात येणार असल्याचे बँकेच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी सांगितली.