जे. डे. हत्याकांड, जिग्ना व्होरा यांचा कटात प्रत्यक्ष सहभाग असल्याचे पुरावे नाहीत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जे. डे. हत्याकांडातील आरोपी जिग्ना व्होरा हिला मुंबई उच्च न्यायालयाने आज मोठा दिलासा दिला. जिग्ना हिच्या दोषमुक्ततेला सीबीआयने हायकोर्टात आव्हान दिले होते. न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या खंडपीठाने सीबीआयने केलेला अपील अर्ज फेटाळून लावला. एवढेच नव्हे तर जे. डे. यांच्या हत्या प्रकरणात जिग्ना हिचा प्रत्यक्ष सहभाग असल्याचे पुरावे सीबीआयकडे नाहीत असेही स्पष्ट केले.

11 जून 2011 रोजी ज्येष्ठ पत्रकार जोतिर्मय डे ऊर्फ जे. डे. यांची पवई येथे गोळ्या घालून हत्या करण्यात आली. ही हत्या छोटा राजनच्या सांगण्यावरून झाल्याचा दावा करत मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने पत्रकार जिग्ना व्होरा, सतीश काल्या, अभिजित शिंदे, अरुण डाके, सचिन गायकवाड, अनिल वाघमोडे, नीलेश शेंडगे, मंगेश अगनावे, विनोद असरानी, पॉल्सन जोसेफ व दीपक सिसोदिया यांना अटक करून त्यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले होते. या प्रकरणावर न्यायालयात आज झालेल्या सुनावणीच्या वेळी सीबीआयने बाजू मांडताना जिग्नाने जे. डे. यांच्या गाडीचा क्रमांक तसेच त्यांची छायाचित्रे मारेकऱयांना पुरविली. तसेच छोटा राजन याच्याबरोबर टेलिफोनवरून झालेल्या संवादाची माहिती दिली. त्यावर न्यायमूर्तींनी व्होराकडील विविध सिमकार्ड, मोबाईल हस्तगत करूनही तिचा प्रत्यक्ष या कटात सहभाग असल्याचे दिसून येत नाही असे निरीक्षण नोंदवत सीबीआयकडे सबळ पुरावे नसल्याचे स्पष्ट करत खंडपीठाने अपील अर्ज फेटाळून लावला.

पॉल्सनच्या अर्जावर लवकरच सुनावणी
जिग्नासह जॉन पॉल्सन जोसेफ यांचीही सत्र न्यायालयाने निर्दोष सुटका केली असून त्याच्या दोषमुक्ततेला सीबीआयने मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. पॉल्सनविरोधात दाखल केलेल्या अपिलावर हायकोर्टात लवकरच सुनावणी होणार आहे.