चालत राहा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> वरद चव्हाण, [email protected]

अभिनेत्री पल्लवी वैद्य. खेळाची पार्श्वभूमी आणि चालण्याची प्रचंड आवड या दोन गोष्टींमुळे पल्लवीने स्वतःला फिट ठेवले आहे.

नमस्कार फिटेनस फ्रिक्स! तुम्हाला ‘अगंबाई अरेच्चा’मधली संजय नार्वेकरांची बहीण आठवत असेलच ना? या चित्रपटाने यशाचे सर्व रेकॉर्डस् मोडले होते. पण याच चित्रपटाच्या अनेक चांगल्या पैलूंपैकी एक अशी अभिनेत्री लोकांच्या लक्षात राहिली जी गर्ल-नेक्स्ट डोअर, निरागस आणि मस्तीखोर संपूर्ण चित्रपटात वाटत होती. हा चित्रपट 2004 साली आला. यानंतर अनेक मालिका आणि चित्रपटांमधून ती अभिनेत्री प्रेक्षकांच्या भेटीला येत राहिली, पण आज या अभिनेत्रीने प्रेक्षकांच्या मनात एक आदराचं स्थान निर्माण केलंय ते ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेतील तिच्या राणी ‘पुतळाबाई’ या भूमिकेमुळे. आता 2004 ते 2019 हा टाईम स्पॅन जर आपण बघितलात तर आपल्या लक्षात येईल की, या 16 वर्षांत तिच्या खऱया आयुष्यात आई झाल्यानंतरसुद्धा आपल्या आजच्या सेलिब्रेटींनी स्वतःला चांगलंच मेंटेन केलंय. नुसतं मेंटेन नाही तर खूप कमी लोकांच्या चेहऱयावरचा फ्रेशनेस किंवा रोज दीर्घकाळासाठी टिकून राहतं अशीच आहे. आपली आजची फिट अभिनेत्री ‘पल्लवी वैद्य’. शाळेपासूनच स्पोर्टस्मध्ये खूप ऍक्टिव्ह होती. म्हणजे कबड्डी, खो-खो, डज बॉल, रनिंग या सगळय़ात ती भाग घेत असे आणि बऱयाच वेळा जिंकतही असे. या सगळय़ासाठी तिला प्रेरणा मिळायची तिच्या बाबांकडून. तिचे बाबा भोसला मिलिटरी स्कूलचे विद्यार्थी होते. तिचे बाबा फिट आणि एक उत्तम खेळाडू असल्यामुळे त्यांनी अनेक पारितोषिकं पटकावली होती. घरात असलेली ही पारितोषिके बघूनच आपणसुद्धा ही जिंकली पाहिजेत आणि बाबांच्या ट्रॉफीच्या बाजूलाच आपलीदेखील एक ट्रॉफी असावी असे तिला सतत वाटत असे. म्हणून ती प्रत्येक खेळात खूप मेहनत घ्यायची आणि ती अनेक वेळा जिंकायचीसुद्धा. शाळेत असताना आपण स्पोर्टस्मध्येच करीयर करावे असेदेखील तिचं स्वप्न होतं. पण कॉलेजला गेल्यावर हे स्वप्न स्वप्नच राहिलं. माणसाने एकदा डिग्री मिळवण्याच्या शर्यतीत भाग घेतल्यावर 100 मीटर धावण्याच्या शर्यतीला कोण विचारतंय हो?

त्यामुळे तिच्या कॉलेजच्या काळात ती संपूर्णपणे खेळापासून लांब राहिली. पण जर तुम्हाला आठवत असेल तर मी माझ्या अनेक लेखांत सांगत आलोय की, वाढत्या वयामध्ये खेळणं किती गरजेचं असतं ते. त्या वयात मैदानी खेळ खेळायचा फायदा आपल्याला आयुष्यभर होतो. म्हणूनच कदाचित पल्लवी अजूनही फ्रेश वाटत असावी. चालण्याची सवय पल्लवीने कॉलेजपासून आजपर्यंत जपली आहे. रिक्षा-टॅक्सी करणं ती शक्यतो टाळते. पल्लवीने 1-2 वेळा व्यायामशाळेतसुद्धा जाण्याचा प्रयत्न केला. पण एकाच जागी ट्रेडमिलवर 40-40 मिनिटं चालण्यापेक्षा तिला बाहेरच्या मोकळय़ा हवेत चालायला कधीही आवडतं. घरातली सगळी कामं म्हणजे फळे, भाज्या, मासे व इतर सामान आणायला पल्लवी स्वतः चालत जाते. पल्लवीचं सासर ‘दादर’चं आहे. अनेक वेळा भाज्या व इतर गोष्टी आणण्यासाठी ती शिवाजी पार्क ते दादर टी.टी. चालत जाते. शरीराला थोडी वजन उचलण्याचीसुद्धा सवय लागावी यासाठी सगळी खरेदी झाल्यानंतर ती टॅक्सी न करता पुन्हा घरी चालत जाते. अशावेळी इतर लोक आपल्याकडे सेलिब्रिटी म्हणून बघतात याची पर्वा न करता ‘चालणं’ हे खूप गरजेचे आहे हा विचार तिच्या मनात असतो. थोडक्यात काय तर स्वतःच्या संसारासाठी जो संघर्ष अनेक गृहिणी करतात तो संघर्ष आपले लाडके कलाकारदेखील करतात. फरक इतकाच की आम्ही कलाकार लोक या संघर्षाला व्यायामाच्या दृष्टिकोनातून बघतो. उदाहरणतः आपण आज किती पावलं चालतो आणि किती कॅलरीज बर्न झाल्या याचा रेकॉर्ड ठेवतो. पल्लवीच्या सतत चालण्याच्या सवयीमुळे ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमात तिची खिल्ली उडवण्यात आली होती की, ‘पैसे नसतात म्हणून ही सगळीकडे चालत जाते’, पण हा विनोदसुद्धा पल्लवीने स्पोर्टिंगली घेतला होता. याशिवाय ट्रेकिंगला जाणे, रोप क्लायबिंगची आवड पल्लवीला आहेच. ‘‘आई’’ झाल्यावर मात्र पल्लवीचं वजन वाढलं होतं. तेव्हा पल्लवीने व्यायामशाळेत जाण्याचा निर्णय घेतला. तेव्हासुद्धा अति वजन न उचलता फक्त कार्डिओवर तिने भर दिला. याशिवाय वजन कमी करण्यात तिला सर्वात जास्त फायदा झाला तो तिची मैत्रीण कविता लाड यांच्या मार्गदर्शनाचा. कविताजी स्वतःच्या आहाराबाबत खूप जागरुक आहेत. तिच्याकडून योग्य सल्ले घेऊन पल्लवीने स्वतःचा आहार ठरवला व वजन कमी करण्यात तिला त्याचा फायदादेखील झाला. गेल्या एक-दीड वर्षात हायपर थायरॉईड डिटेक्ट झाल्यामुळे पल्लवीचं वजन अचानक कमी होऊ लागलं. या आजाराचा 18 महिन्यांचा कोर्स असतो. तो कोर्स तिचा पूर्ण होत आलाय. पण या आजारामुळे पल्लवी स्वतःच्या आहारावर जास्त लक्ष देऊ लागली आहे. तिने साखर पूर्णपणे बंद केली आहे. साखरेऐवजी चहात गूळ टाकण्याला ती जास्त प्राधान्य देते. भाताचे प्रमाण कमी झालंय. ज्वारी किंवा नाचणीची भाकरी खाणं आणि सगळय़ात महत्त्वाचं म्हणजे बाहेरचं जंक फूड खाणं तिने बंद केलंय. ‘संभाजी’ या मालिकेसाठी तिला दोन वयोगट दाखवायचे होते. तरुण ‘पुतळाबाई’ सादर करताना बारीक राहणं त्याचबरोबर प्रौढ वयाच्या ‘पुतळाबाई’ सादर करण्यासाठी वजन वाढवणे आवश्यक होते. वजन वाढवण्यासाठी पल्लवीने केळी खायला सुरुवात केली. त्याचबरोबर कार्ब्स आणि फॅट्स असलेला आहारही सुरू झाला. पण याहीपेक्षा कठीण होतं ते भूमिका संपल्यावर बारीक होणं. यासाठी तिची चालण्याची सवय तिच्या कामी आली. चालण्याबरोबरच तिने योगा आणि मेडिटेशनचासुद्धा आधार घेतला आहे. आज पल्लवीप्रमाणेच अनेक मुलींना थायरॉईड या आजाराला सामोरे जावे लागते. त्या प्रत्येक मुलीला पल्लवी आवर्जून सांगते की, मुळात थायरॉईड हा खूप मोठा आजार नाही. आपल्याला काही झालंय ही भावनाच मनातून काढून टाकायची. डॉक्टरचा सल्ला व डॉक्टरांनी दिलेली औषधं जर वेळच्या वेळी घेतली तर थायरॉईड नियंत्रणामध्ये नक्कीच येऊ शकतं. तुम्हाला हा लेख आवडला असेल अशी आशा करतो. भेटूया, पुढच्या शनिवारी आणि जाणून घेऊ एका नव्या सेलिब्रिटीचं फिटनेस गुपित.