
बँकांचे घोटाळे थांबलेले नाहीत आणि फसवेगिरीची रक्कम 74 टक्क्यांनी वाढली असे रिझर्व्ह बँकच जाहीर करत असेल तर आर्थिक आघाडीवर देशात नेमका कोणता बदल झाला, असा प्रश्न देशवासीयांना पडू शकतो. बँकांचे घोटाळे हा देशाच्या आर्थिक विकासातील सर्वात मोठा अडसर आहे. देशातील उद्योग–व्यवसायांसह सर्वच क्षेत्रांवर आज मंदीचे संकट ओढवले आहे. त्यामुळे रोजगाराची निर्मिती ठप्प झाली आणि आहे त्यांच्या नोकऱ्याही धडाधड जात आहेत. मंदीबाईच्या फेऱ्यामुळे अर्थव्यवस्थेची गती मंदावली असली तरी बँक घोटाळ्यांची ‘तेजी’ मात्र वाढते आहे. आर्थिक आघाडीवरील हे चित्र चिंताजनकच म्हणावे लागेल.
बँकांमधील आर्थिक घोटाळे हा हिंदुस्थानच्या अर्थव्यवस्थेला लागलेला कलंक आहे आणि हा कलंक काही केल्या देशाची पाठ सोडायला तयार नाही. रिझर्व्ह बँकेने गुरुवारी जाहीर केलेला वार्षिक अहवाल तर डोळ्यांत झणझणीत अंजन घालणाराच आहे. देशातील विविध बँकांमध्ये घोटाळे आणि फसवेगिरीची एकंदर 6 हजार 801 प्रकरणे उघडकीस आली आणि त्यातून एकाच वर्षात 71 हजार 542 कोटी रुपयांची लूट झाली अशी धक्कादायक माहिती रिझर्व्ह बँकेने आपल्या अहवालात दिली आहे. 2018-19 या एका आर्थिक वर्षात देशातील बँकांच्या फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये 15 टक्क्यांनी वाढ झाली आहे. भानगडी 15 टक्क्यांनी वाढल्या असल्या तरी घोटाळे आणि फसवेगिरीची रक्कम तब्बल 73.8 म्हणजे 74 टक्क्यांनी वाढली आहे, असे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे. हिंदुस्थानच्या तमाम बँकांमध्ये मोठ्या प्रमाणावर फसवेगिरी आणि लुटालूट बोकाळली आहे, हाच या अहवालाचा अर्थ आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही देशाची मध्यवर्ती बँक तर आहेच, पण देशातील तमाम बँकांची ती जननी आहे. त्यामुळे या अहवालावर विश्वास ठेवावाच लागेल. वर्षभरातील घोटाळ्यांचा 71 हजार कोटींचा जो आकडा रिझर्व्ह बॅंकेने जाहीर केला त्याचे गांभीर्य वाढते ते यामुळेच. देशातील यच्चयावत सर्व बँकांवर रिझर्व्ह बँकेचेच नियंत्रण आहे आणि रिझर्व्ह बँकेने घालून दिलेल्या
नियमावलीनुसारच
बँकांनी आपले आर्थिक व्यवहार आणि कामकाज करावे असे अपेक्षित असते. मात्र अनेक बँका आणि बँकांचे व्यवस्थापन रिझर्व्ह बँकेचे कायदेकानू धाब्यावर बसवून खिरापत वाटावी अशा पद्धतीने शेकडो, हजारो कोटींच्या रकमा ‘कर्जबुडव्यां’वर उधळत असतात. गोरगरीब शेतकऱ्यांना तर या बँका आपल्या दारातही उभे करत नाहीत. छोट्या मोठ्या कर्जांसाठी बँकांचे उंबरठे झिजवणाऱ्या मध्यमवर्गीयांच्या हातातही जाचक अटी आणि शर्तींची यादी सोपविली जाते. बेरोजगारीच्या संकटात सापडलेल्या तरुणांनी उपजीविकेसाठी व्यवसाय उभारावा म्हणून बँकेसमोर मदतीसाठी हात पसरले तर त्यांनाही मोठे तारण काय देणार ते सांगा असे बजावून कर्जे नाकारली जातात. याउलट बुडव्या उद्योजकांसाठी मात्र याच बँका गालिचे अंथरतात. बँकांचे बडे अधिकारी महाबुडव्यांना घरपोच सेवेची व्हीआयपी ट्रिटमेंट तर देतातच, पण काही कोटींचे फुटकळ तारण घेऊन त्यांच्यावर शेकडो–हजारो कोटींची दौलतजादा करतात. राजवटी कोणाच्याही असोत, पण बँकांना लुटण्याचा सिलसिला मात्र कायम असतो. गेल्या काही वर्षांत बँकांमध्ये 2 लाख कोटींचे घोटाळे झाले असे सांगितले जाते. फार लांबचे सोडा, पण 2016-17 मध्ये 18 हजार 170 कोटी, 2017-18 मध्ये 41 हजार 167 कोटी आणि आता 2018-19 मध्ये 71 हजार 500 कोटी हा बँक घोटाळ्यांचा वाढता आलेख काय सांगतो? बँकांची लूट ही एका अर्थाने देशाचीच लूट असते. पुन्हा बँकांना लुबाडून आपले
उखळ पांढरे करून घेणाऱ्या
मंडळींचे हात इतके पोहोचलेले असतात की हपापाचा माल गपापा केल्यानंतरही त्यांच्या केसालाही धक्का लागत नाही. त्यामुळे एक तर अशा आर्थिक घोटाळ्यांना लवकर वाचाच फुटत नाही आणि कसेबसे बिंग फुटले तरी घोटाळेबाजांना संरक्षण देणारे अदृश्य हात लगेच सक्रिय होतात. फारच बोभाटा झाला तर हजारो कोटींचे कर्ज बुडवणारे महाघोटाळेबाज देशाबाहेर सुरक्षित पोहोचल्यानंतर तपास यंत्रणा खडबडून वगैरे जाग्या होतात. राजसत्ता बदलली म्हणजे देशाची संपूर्ण सिस्टिम बदलली असे नव्हे. घोटाळेबाज आणि त्यांना मदत करणारे पडद्यामागचे हात यांची व्यवस्थेतील उतरंड आहे तशीच आहे. काही मोहरे भलेही बदलले असतील, मात्र बँकांची लुटालूट मागच्या पानावरून पुढील पानावर तशीच सुरू आहे. बँकांचे घोटाळे थांबलेले नाहीत आणि फसवेगिरीची रक्कम 74 टक्क्यांनी वाढली असे रिझर्व्ह बँकच जाहीर करत असेल तर आर्थिक आघाडीवर देशात नेमका कोणता बदल झाला, असा प्रश्न देशवासीयांना पडू शकतो. बँकांचे घोटाळे हा देशाच्या आर्थिक विकासातील सर्वात मोठा अडसर आहे. देशातील उद्योग–व्यवसायांसह सर्वच क्षेत्रांवर आज मंदीचे संकट ओढवले आहे. त्यामुळे रोजगाराची निर्मिती ठप्प झाली आणि आहे त्यांच्या नोकऱ्याही धडाधड जात आहेत. मंदीबाईच्या फेऱ्यामुळे अर्थव्यवस्थेची गती मंदावली असली तरी बँक घोटाळ्यांची ‘तेजी’ मात्र वाढते आहे. आर्थिक आघाडीवरील हे चित्र चिंताजनकच म्हणावे लागेल.



























































