
संयुक्त महाराष्ट्र लढय़ासह मुंबईतील अनेक चळवळींत गिरणी कामगारांनी सक्रिय सहभाग घेतला. मुंबईच्या उभारणीत गिरणी कामगारांचे योगदान मोलाचे आहे. त्यांच्याच घामातून मुंबई उभी राहिली आहे. त्यामुळे भायखळ्यात पालिकेच्या माध्यमातून उभारण्यात येणार्या टेक्स्टाईल म्युझियमबरोबरच या ठिकाणी गिरणी कामगारांसाठी घरे बांधा असे स्पष्ट मत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले. याला पालिका प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळे या ठिकाणी टेक्स्टाईल म्युझियमसह गिरणी कामगारांसाठी घरे उपलब्ध होणार आहेत.
शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव साहेब ठाकरे यांनी आज काळाचौकी, मुंबई येथील इंडिया युनायटेड मिलच्या जागेवर उभारण्यात येणाऱ्या टेक्सटाइल पार्क संग्रहालयाच्या कामाचा आढावा घेतला. pic.twitter.com/B1ckPioJBK
— ShivSena – शिवसेना (@ShivSena) August 31, 2019
पालिकेच्या माध्यमातून भायखळा येथे उभारण्यात येणार्या टेक्स्टाईल म्युझियममध्ये गिरणी कामगारांचा इतिहास, त्यांचे सामाजिक योगदान आणि सांस्कृतिक पैलूंचे दर्शन घडणार आहे. मात्र मुंबईच्या उभारणीत मोलाचे योगदान देणार्या गिरणी कामगारांसाठी या ठिकाणी घरे बांधल्यास त्यांना खर्या अर्थाने न्याय मिळेल अशी भूमिका शिवसेनेने घेतली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निर्देशानुसार महापौर प्रिं. विश्वनाथ महाडेश्वर यांनी पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांना आवश्यक कार्यवाही करण्यासाठी पत्र दिले आहे. या ठिकाणी विविध विकासकामांतील प्रकल्पग्रस्तांसाठीदेखील घरे बांधा, असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर आज उद्धव ठाकरे यांनी प्रस्तावित टेक्स्टाईल म्युझियमच्या जागेची पाहणी केली. यावेळी सार्वजनिक बांधकाम–आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे, महापौर प्रिं. विश्वनाथ महाडेश्वर, आमदार ऍड. अनिल परब, आमदार अजय चौधरी, आमदार सुनील शिंदे, पालिका सभागृह नेत्या विशाखा राऊत, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी आदी उपस्थित होते
असे होणार टेक्स्टाईल म्युझियम
भायखळ्यात दि इंडिया युनायटेड मिल क्रमांक 2 व 3 च्या जागेवर रिक्रिएशन ग्राऊंड– कम टेक्स्टाईल म्युझियम उभे करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. या ठिकाणी कापड उद्योगग्राम या संकल्पनेवर विकास करण्यात येणार आहे. एकूण 10 एकरांवर हे काम होणार आहे.
मिलची जागा ‘एनटीसी’कडून महापालिकेला हस्तांतरित करण्यात आली आहे. या जागेवर महापालिकेच्या वतीने टेक्स्टाईल म्युझियम उभारले जाईल. या मिलमधील 4400 चौ. मीटरचा परिसर महाराष्ट्र सरकारने रिक्रिएशन ग्राऊंड– कम टेक्स्टाईल म्युझियमच्या वापराकरिता अधिसूचित केलेला आहे.
पालिकेकडून या जागेचे संवर्धन, संरक्षण, पुनर्वापर आणि विकास दोन टप्प्यांत केला जाणार आहे. टप्पा-1 मध्ये मिलमधील संरक्षित तळे व त्यालगतचा परिसर यांचे सुशोभीकरण, प्रकाश व ध्वनी माध्यमातून गिरणीचा इतिहास व गिरणी कामगारांचे सामाजिक योगदान व सांस्कृतिक पैलू यांचे सादरीकरण केले जाईल तर दुसर्या टप्प्यात विद्यमान वास्तूमध्ये टेक्स्टाईल म्युझियम, वाचनालय, सभागृह, कलाप्रदर्शन, पब्लिक प्लाझा आदी बाबींकरिता अंतर्गत बदल करून या पुरातन वास्तूंचे संवर्धन आणि पुनर्वापर करण्यात येईल. या प्रकल्पाचा एकूण खर्च 300 कोटी इतका असून या वर्षासाठी पालिकेने अर्थसंकल्पात 25 कोटी रुपयचीं तरतूद केली आहे.
नोकर्याही उपलब्ध होतील
मुंबईतील गिरण्या बंद पडल्यामुळे गिरणी कामगार देशोधडीला लागला आहे. गिरण्यांची जागा मॉल संस्कृतीने घेतली. मात्र या ठिकाणी गिरणी कामगारांसाठी घरे बांधल्यास परिसरात असणार्या उद्योगधंद्यांमध्ये गिरणी कामगारांच्या मुलांना नोकर्या मिळतील, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यासाठी, कायदेशीर बाबी तपासून पाहण्यासाठी संबंधितांसोबत लवकरच बैठक घेऊन अंतिम निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.


























































