बेशिस्त ट्रक चालकामुळे ऐन गणेशोत्सवात वाहतूक कोंडी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उरण तालुक्यातील रस्त्यावर वाहतूकीचा प्रश्न गंभीर असताना शनिवारी संध्याकाळी खोपटे-कोप्रोली मार्गावर खोपटे गावाजवळ एका बेशिस्त वाहनचालकामुळे नागरीकांना वाहतूक कोंडीचा फटका सहन करावा लागला. उघड्या ट्रेलरवरून हजारो लाकडी फळ्या वाहून नेल्या जात असताना या फळ्यांचा दोर तुटल्याने रस्त्यावर पडल्या त्यामुळे वाहतूकीला अडथळा निर्माण होऊन वाहतूक कोंडी झाली होती. रविवार दुपारी 4 वाजेपर्यंत या ट्रकमधून पडलेले सामान हटविण्याचे काम सुरू होते.

या मार्गावर मोठ मोठाले खड्डे असल्याने अगोदर या मार्गावरून वाहतूक धिमी असते. शनिवारी संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास कोप्रोलीकडून जेएनपीटीच्या दिशेला जाणाऱ्या एका भल्या मोठ्या उघड्या ट्रेलरवरून हजारो लाकडी फळ्या वाहून नेल्या जात असताना या फळ्याना बांधलेला दोर तुटला आणि या फळ्या आणि ट्रेलरवरील अवजड सामान रस्त्यावर पडले. सुदैवाने या वाहनाच्या बाजूला कोणीही मनुष्य नव्हता नाहीतर मोठी हानी झाली असती. अशा प्रकारे लुज कार्गो उघड्या ट्रकमधून वाहून नेण्यास मनाई असताना बेजबाबदार ट्रक मालकाने भाड्याच्या हव्यासापोटी हा धोका पत्करला होता. मात्र त्याचा फटका येथील सामान्य नागरीकांना बसला. गणपतीच्या खऱेदी साठी गेलेल्या नागरीकांचा मात्र विनाकारण खोळंबा झाला. रविवारी दुपार पर्यंत वाहतूक पोलिसांच्या सहकार्याने हे सामान हटविण्याचे काम सुरू होते.