
राज्य शासनाच्या 33 कोटी वृक्ष लागवडीच्या मोहिमेला सर्वत्र जोरदार प्रतिसाद प्राप्त होत असताना मराठवाडा विभागातील लातूर आणि परभणी हे दोन जिल्हे वृक्षलागवडीत मागे आहेत. या जिल्ह्यांनी म्हणावे तसे काम केलेले नाही. मराठवाड्यात सर्वाधिक 94.14 टक्के वृक्षलागवड नांदेड जिल्ह्यात झाली आहे. याबाबतीत संभाजीनगर दुसऱ्या स्थानावर आहे.
राज्याचे वन क्षेत्र वाढावे, पर्यावरणाचा समतोल राखला जावा या उद्देशाने राज्य शासनाने 33 कोटी वृक्षलागवडीची मोहीम राबविली जात आहे. त्यानुसार प्रत्येक जिल्हा, विभागांसाठी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट निर्धारित केले आहे, त्यासाठी राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवर यांनी विभागवार बैठका घेऊन वृक्षलागवडीचे उद्दिष्टपूर्ती कशी होईल, या अनुषंगाने मार्गदर्शनही केले आहे, असे असताना काही जिल्हे याबाबतीत अद्याप मागे आहेत. त्यात मराठवाडा विभागातील लातूर आणि परभणी जिल्ह्यांचा समावेश आहे. अनुक्रमे 58.29, 59.03 टक्के वृक्षलागवड करण्यात आली आहे. ही इतर जिल्ह्यांच्या तुलनेत मागे आहे.
मराठवाड्याला 9 कोटींचे उद्दिष्ट
मराठवाडा विभागाचे वन क्षेत्र तसे इतर प्रदेशाच्या तुलनेत कमीच आहे. मराठवाड्यातील वन क्षेत्र वाढावे यासाठी सर्वस्तरावर प्रयत्न होण्याची गरज आहे. येथील वन क्षेत्र वाढीसाठी यंदा विभागात 9 कोटी 28 लाख 93 हजार वृक्षलागवड करण्याचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले आहे. 1 जुलै ते 30 सप्टेंबर या कालावधीत ही वृक्षलागवड मोहीम सर्व शासकीय यंत्रणेबरोबरच खासगी संस्था, शाळांनी सक्रिय सहभाग घेऊन राबवावी, असे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. त्यानुसार मराठवाड्यात सर्वाधिक 94.14 टक्के वृक्षलागवड नांदेड जिल्ह्याने केली आहे. या जिल्ह्यास 1 कोटी 60 लाख 70 हजार 400 वृक्षलागवड करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते, त्यात या जिल्ह्याने 1 कोटी 51 लाख 28 हजार 515 वृक्ष लावले आहेत.
या जिल्ह्यापाठोपाठ संभाजीनगरचा क्रम लागतो. या जिल्ह्याने दिलेल्या 1 कोटी 11 लाखांपैकी 95 लाख 93 हजार 917 वृक्ष लागवले आहेत. अन्य जिल्ह्यांत बीड-84.89, हिंगोली-79.93, जालना-79.68 आणि धाराशिव जिल्ह्यात आतापर्यंत 87.29 टक्के वृक्षलागवड करण्यात आली आहे. या जिल्ह्यास 97 लाख 81 हजार 200 वृक्षलागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे, त्यापैकी 85 लाख 37 हजार 847 वृक्षलागवड करण्यात आली आहे.
मुळातच मराठवाडा विभागावर यंदा वरुणराजाची कृपा झालेली नाही, त्याचा फटका वृक्ष लागवडीला निश्चित बसला आहे. कारण पिण्यासाठी टँकर्सवर अवलंबून राहावे लागत असताना वृक्षलागवड आणि संवर्धन कसे करायचे, असा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे.



























































