
हिंगोलीमधील फाळेगाव येथे घरकुलाचे खोदकाम सुरू असताना 185 चांदीची नाणी व इतर चांदीच्या वस्तू आढळल्या आहेत. ही नाणी पाहण्यासाठी इथे गर्दी जमायला सुरुवात झाली आहे. महसूल विभागाने नाण्यांचा पंचनामा करून ती ताब्यात घेतली आहेत. नाण्यांबाबत अधिक माहिती देण्यासाठी तहसीलदारांनी टाळले आहे.
फाळेगाव येथील नर्मदाबाई जयचंद आसोले यांच्या घराच्या पायाचे खोदकाम सुरू होते. मंगळवारी सायंकाळच्या सुमारास पायाचे खोदकाम करत असताना, काहीतरी टणक वस्तू लागली. त्यामुळे मजुरांनी त्याठिकाणी बघितले तर एका भांड्या मध्ये चांदीचे नाणी असल्याचे आढळून आले. ही बाब दडवून ठेवण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले मात्र नाणी देवाण-घेवाणीवरून मजूर आणि घर मालक यांच्यामध्ये जोरदार वाद सुरू झाला असे सांगण्यात येते. ही बाब महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना कळविण्यात आली.
हिंगोली तहसील कार्यालयाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी घटनेची चौकशी केली. घटनास्थळी असलेले महसूल विभागाचे अधिकारी व तहसीलदार शिंदे यांनी या नाण्यांबाबत अधिक माहिती देण्यास टाळाटाळ केली आहे. तहसीलदार शिंदे यांनी त्यांचा मोबाईल फोनही स्विच ऑफ करून ठेवला आहे. ही माहिती का दवडण्यात येतेय असा प्रश्न यामुळे विचारला जात आहे.
























































