
आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत पहिल्या स्थानावर विराजमान असणारा ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टिव स्मिथ जबरदस्त फॉर्मात आहे. अॅशेस मालिकेतील चौथ्या कसोटीत स्मिथने गुरुवारी आणखी एक शतकी खेळी केली. स्मिथचे कसोटीतील हे 26 वे शतक आहे. या शतकासह स्मिथने अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत.
कसोटीमध्ये सर्वात वेगात 26 शतक ठोकणाऱ्यांच्या यादीत स्मिथने सचिनला मागे सोडले आहे. स्मिथ दुसऱ्या स्थानावर पोहोचला असून त्याच्यापुढे दिग्गज फलंदाज सर डॉन ब्रॅडमन आहेत. त्यांनी फक्त 69 कसोटी डावात 26 शतकांचा टप्पा गाठला होता. हाच टप्पा गाठण्यासाठी सचिनला 136 डाव खेळावे लागले, तर स्मिथने हा टप्पा 121 व्या डावात पार केला आहे.
अॅशेसमध्ये 500 पार
शतकी खेळीसह स्मिथने अॅशेस मालिकेत 500 धावांचा टप्पाही पार केला आहे. स्मिथने तिसऱ्यांदा अॅशेस कसोटी मालिकेत 500 पेक्षा धावा चोपल्या आहेत. तर सर डॉन ब्रॅडमन यांनी पाच वेळा हा धावांचा जादुई आकडा पार केला आहे. तसेच स्मिथने इंग्लंडविरुद्ध गेल्या 8 डावात 5 शतक झळकावली आहेत, तर एकूण कारकीर्दीत इंग्लंडविरुद्ध त्याचे हे 11 वे शतक आहे.
26th Test hundred for Steve Smith – what a player!
FOLLOW #Ashes live https://t.co/zrb0K55IBc pic.twitter.com/oF91qkVxgC
— ICC (@ICC) September 5, 2019
जबरदस्त फॉर्म
एक वर्ष बंदीची कारवाई संपवून आल्यानंतर स्मिथने दमदार पुनरागमन केले आहे. अॅशेस मालिकेतील पहिल्या कसोटीत दोन्ही डावात त्याने 144 आणि 142 अशी शतकी खेळी केली होती. त्यानंतर दुसऱ्या कसोटीतही त्याने अर्धशतकीय खेळी केली होती. मात्र दुखापतीमुळे तो तिसऱ्या कसोटीला मुकला होता. आता चौथ्या कसोटीतील पहिल्या डावातही त्याने शतक झळकावले आणि आपला फॉर्म दाखवून दिला.



























































