
जिह्यात आजही धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम राहिला तर शहरासह पावसाची उघडझाप सुरू होती. काल जिह्यात दिवसभरात एकूण 478.05 व सरासरी 39.84 मि.मी. पावसाची नोंद झाली. गगनबावडा तालुक्यात सर्वांत जास्त 142.50 मि.मी. पाऊस झाला. दरम्यान, आज दुपारी राधानगरी धरणाचा आणखी एक असे एकूण पाच स्वयंचलित दरवाजे उघडले असून 8,540 क्युसेकने विसर्ग सुरू होता. त्यामुळे पंचगंगेच्या पातळीत आज आणखी पाच फुटांची वाढ होऊन तिसऱ्यांदा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले. दुपारपर्यंत 42 पेक्षा जास्त बंधारे पाण्याखाली गेले होते.
राधानगरी धरणाचे बुधवारी चार स्वयंचलित दरवाजे उघडले होते. आज दुपारी धरणाचा 7 नंबरचा आणखी एक स्वयंचलित दरवाजा उघडला असून धरणातून 8,540 क्युसेक विसर्ग सुरू होता तर सायंकाळी कोयनेतून 70 हजारांनी आणि कर्नाटकातील अलमट्टी धरणातून 1 लाख 9 हजार 366 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता.
पंचगंगेच्या पातळीत पाच फुटांनी वाढ
कसबा बावडा येथील राजाराम बंधाऱ्याजवळील पंचगंगेची पाणीपातळी आज सकाळी 7 वाजता 26.8 फूट होती तर सायंकाळी पाचच्या सुमारास यामध्ये दीड ते दोन फुटांची वाढ होऊन 29 फूट 2 इंच झाली होती. पंचगंगा नदीवरील सुर्वे 26.4, रुई 55.3, इचलकरंजी 52, तेरवाड 45.6, शिरोळ 37.9, नृसिंहवाडी 35.9, राजापूर 24 फूट, तर नजीकच्या सांगली 16.3 आणि अंकली पुलाची 18.5 फूट अशी पाणीपातळी होती.
राधानगरी धरणात आजअखेर 8.35 टीएमसी पाणीसाठा आहे. जंगमहट्टी, घटप्रभा कोदे लघुप्रकल्प, पाटगाव, चिकोत्रा, कासारी व जांबरे मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत.
तब्बल 42 बंधारे पाण्याखाली…
पंचगंगा नदीवरील शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ, भोगावती नदीवरील हळदी, शिरगाव, राशिवडे, सरकारी कोगे व खडक कोगे, करंजफेण, बाजारभोगाव, वालोली, पुनाळ- तिरपण, ठाणे आवळे व यवलूज, वारणा नदीवरील चिंचोली व माणगाव, दूधगंगा नदीवरील सिद्धनेर्ली, बाचणी, सुळंबी व दत्तवाड, वेदगंगा नदीवरील गारगोटी, म्हसवे, निळपण, वाघापूर, कुंभी नदीवरील कातळी, सांगशी, शेणवडे आणि तुळशी नदीवरील बीड असे एकूण 42 बंधारे पाण्याखाली गेले होते.
‘कोयना’तून विसर्ग सुरूच
सातारा, दि. 5 (प्रतिनिधी) – साताऱ्यासह जिह्याच्या पश्चिम भागात पावसाचा कहर कालच्या तुलनेत आज काहीसा कमी झाला. त्यामुळे कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे 10 फुटांवरून 8 फुटांवर आणण्यात आले. आता धरणातून प्रतिसेकंद 70 हजार 404 क्युसेक पाणी कोयना नदीपात्रात सोडण्यात येत आहे. त्यामुळे कोयना नदीकरील नेरळे, मूळगाक, निसरे येथील पूल पाण्याखाली गेल्याने अनेक गाके अद्यापही संपर्कहीनच आहेत. महाबळेश्वरमध्ये मुसळधार पाऊस सुरू असून सातारा, जावली, पाटण, कराड, वाई या तालुक्यांमध्येही पावसाची रिपरिप आहे.

























































