माणसाच्या डोक्यावर उगवलं शिंग! डॉक्टरही पडले बुचकळ्यात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लहानपणी ‘डोकं आपटलं की शिंग उगवतात’ ही गंमत सगळ्यांनीच अनुभवली असेल. पण, एखाद्याला खरोखर शिंगं उगवली तर? काय गहजब होईल ना… असाच एक प्रकार प्रत्यक्षातही घडला आहे. एका वृद्ध माणसाच्या डोक्यावर शिंग उगवल्याची घटना घडली असून या घटनेने वैद्यकीय तज्ज्ञांनाही बुचकळ्यात पाडलं आहे.

मध्य प्रदेशमधील सागर या जिल्ह्यातील श्यामलाल यादव (74) यांच्यासोबत ही घटना घडली आहे. परीकथांमधल्या युनिकॉर्न नावाच्या शिंगाच्या घोड्याप्रमाणे यादव यांच्या डोक्याच्या मधोमध एक चार इंचाचं शिंग उगवलं. जवळपास पाच वर्षं ते शिंग त्यांच्या डोक्यावर होतं. पाच वर्षांपूर्वी त्यांच्या डोक्याला जखम झाली होती. त्यानंतर त्यांच्या डोक्यावर शिंग उगवू लागलं. कित्येक डॉक्टरांकडून उपचार घेऊनही ते शिंग जायला तयार नव्हतं. ते शिंग पाहून डॉक्टरही बुचकळ्यात पडत होते. गेली पाच वर्षं या शिंगामुळे वैतागलेल्या यादव यांनी न्हाव्याकडून ब्लेडने ते कापून छोटं करायचाही प्रयत्न केला. पण काही दिवसांतच शिंग पुन्हा जैसे थे स्थितीत दिसायचं.

man-with-horn

अखेर, तिथल्याच एका स्थानिक डॉक्टरकडे या शिंगावरचा इलाज त्यांना सापडला. या डॉक्टरने काही तपासण्या करून त्यांचं शिंग कापून टाकलं आणि त्यांची सुटका केली. कापलेल्या जागेवर पुन्हा शिंग उगवू नये म्हणून तिथे त्यांच्याच त्वचेचा तुकडा बसवण्यात आला. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, अशा प्रकारे शिंग उगवणं हे अतिशय दुर्मीळ आहे. या प्रकाराला सेबेसियस हॉर्न म्हटलं जातं. डोक्यावरच्या केसांच्या वाढीसाठी केसांच्या मुळाशी सेबेसियस ग्रंथी असतात, ज्यांतील स्रावामुळे केस चमकदार बनतात. ही ग्रंथी बंद झाली तर तो स्राव जमा होतो आणि डोक्यावर शिंगं उगवू शकतं.