उद्धवजींशी उत्तम टय़ुनिंग! जागावाटपाचा प्रश्न सोडवू!- मुख्यमंत्री

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राजेश चुरी

आज संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेना-भाजप महायुतीच्या बाजूने वातावरण आहे. आमच्यात जागावाटपाची चर्चा सुरू आहे. त्यात काही जागांची अडचण आहे. पण सर्वांच्या आशाआकांक्षा-मतमतांतरे असतात. त्यात सर्वांना सामावून घ्यावे लागते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा व माझ्यात ‘टय़ुनिंग’ चांगले आहे. काहीही प्रश्न आले तरी एकत्रित बसून प्रश्न सोडवण्याची आमची तिघांची क्षमता आहे. त्यामुळे जागावाटपाचा प्रश्न सोडवू. काही अडचण येणार नाही, असा जबरदस्त आत्मविश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी व्यक्त केला.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा तिसरा टप्पा नगर व पुणे जिह्यात सुरू आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘सामना’ला खास मुलाखत दिली.

मुख्यमंत्री म्हणाले की, शिवसेना-भाजप महायुती लवकरच जाहीर होईल. त्यादृष्टीने आमची चर्चा सुरू आहे. काही जागांची अडचण आहे. काही जागा शिवसेनेला हव्यात, काही जागा आम्हाला हव्या आहेत. भाजपला वाटते की, एखादी जागा आम्हीच लढवू शकतो. शिवसेनेला वाटते, ते लढू शकतात. शेवटी दोन्ही पक्ष आहेत, पण आम्ही जागावाटपाचा प्रश्न सोडवू. काही अडचण नाही.

मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले, साधारणपणे मी हे बघितले आहे की, उद्धव ठाकरे हे भावनिक विचार करतात. त्यामुळे त्यांच्यासोबत काम करीत असताना फार राजकीय अभिनिवेश नसतो. एक वेगळे नाते असते. त्यातून कधी चार गोष्टी आम्ही त्यांच्या ऐकतो, तर कधी आमच्या दोन गोष्टी ते ऐकतात. हे सुरूच असते. अमित शहा यांचेही उद्धव ठाकरे यांच्याशी तशाच प्रकारचे संबंध आहेत. त्यामुळे काहीही प्रश्न आले तरी एकत्रित बसून सोडवण्याची आमची क्षमता आहे.

ती वन जमीन नाही
आरे कॉलनीत कारशेडला विरोध होत आहे. सरकार म्हणून तुम्हाला ऐकावे लागेल असे आदित्य ठाकरे म्हणाले होते. त्याचा धागा पकडत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, आम्ही नक्कीच ऐकले आहे. आरेच्या संदर्भात ज्या काही अफवा आहेत त्या सर्वप्रथम दूर केल्या पाहिजेत. आरेमध्ये आम्ही ज्या ठिकाणी कारशेड बांधत आहोत ती काही वन जमीन नाही, ती काही पूर्ण झाडांनी वेढलेली नाही असा दावा त्यांनी केला.

मेट्रो पर्यावरणाला पूरक
आम्ही यापूर्वीच 23 हजार झाडे चार वर्षांपूर्वी लावली आहेत. आपण झाडांबद्दल बोलतो, पण मेट्रो झाल्यावर या मेट्रोमुळे अडीच लाख टन कार्बन उत्सर्जन नियंत्रित होईल. अन्यथा एवढा कार्बन नियंत्रित करायचा असेल तर दोन कोटी झाडे लावावी लागतील. म्हणूनच पर्यावरणाला मदत करणारीच मेट्रो आहे. खरेतर एक जरी झाड तुटले तर आम्हाला त्याचे दुःख आहेच, पण आपण इतक्या इमारती बांधत आहोत, घरे बांधत आहोत, झाडे तर तुटतच आहेत. तेव्हा तर पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. मात्र या ठिकाणी पर्यावरणपूर्वक आणि कार्बन सकारात्मक करण्यासाठी आपण हे काम करीत आहोत, असे मुख्यमंत्री म्हणाले.

जपानचा अर्थपुरवठा
मुख्य म्हणजे, जपानने याला अर्थपुरवठा केला आहे. जपानाच्या एजन्सीने एक वर्ष अभ्यास केला आहे. कारण जपान पर्यावरणाच्या बाबतीत अजिबात तडजोड करीत नाही. अर्थपुरवठा करताना शाश्वत विकास ही त्यांची पहिली अट होती याकडे मुख्यमंत्री फडणवीस यांनी लक्ष वेधले.

काही लोकांच्या मनात काळंबेरं
पण तरीही पर्यावरणवाद्यांचे म्हणणे ऐकून घेऊ. जे चांगले लोक आहेत त्यांचे ऐकून घेऊ, पण काही लोकांच्या मनात काळंबेरंही आहे. या प्रकल्पात तेरा हजार आक्षेप आले. त्यातील दहा हजार आक्षेप बंगळुरू येथील ‘झटका डॉट कॉम’ नावाच्या एकाच वेबसाइटवरून आहेत. हे कसे होते, असा प्रश्न त्यांनी केला. पण तरीही अजून काही उपाययोजना करायच्या असतील तर त्या आपण करू, असे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

काँग्रेस प्रवृत्तीपासून महाराष्ट्रमुक्त
विधानसभेनंतर काँग्रेस-राष्ट्रवादीमुक्त महाराष्ट्र करणार का असे मुख्यमंत्र्यांना विचारले असता ते म्हणाले की, काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमुक्त महाराष्ट्र करण्याचा विषय नाही. याचा अर्थ काँग्रेसी प्रवृत्तीपासून मुक्ती आहे. त्या प्रवृत्तीला लोकांनी नाकारलेच आहे. त्यामुळे अभूतपूर्व विजय महायुतीला मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

उद्धव ठाकरे यांच्याशी माझे अतिशय जवळचे संबंध आहेत. साधारणपणे मी हे बघितले आहे की, ते भावनिक विचार करतात. त्यामुळे त्यांच्यासोबत काम करीत असताना फार राजकीय अभिनिवेश नसतो. एक वेगळे नाते असते.

आदित्य ठाकरे प्रॉमिसिंग नेतृत्व
शिवसेना नेते व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे महाराष्ट्रातील अतिशय प्रॉमिसिंग नेतृत्व आहे. ते फिरत आहेत, लोकांना भेटत आहेत. गेली अनेक वर्षे ते विषय समजावून घेत आहेत. राजकारणात अभ्यास व संशोधन करून काम करण्याची त्यांची मानसिकता आहे. भविष्यात शिवसेना त्यांना सांभाळायची आहे. त्यादृष्टीने त्यांचे नेतृत्व चांगले तयार होत आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री फडणवीस यांनी आदित्य ठाकरे यांचे कौतुक केले.