
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ‘एक देश, एक भाषा’ याबाबत केलेल्या वक्तव्यावरून सुरू झालेल्या राजकीय वादात आता अभिनेता आणि राजकीय नेता कमल हसनने उडी घेतली आहे. पूर्ण देशात एकच भाषा लादता येणार नाही, असे करण्याच्या प्रयत्न झाल्यास मोठे जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. ट्विटरवर व्हिडिओ पोस्ट करत कमल हसन यांनी शहा यांच्या वक्तव्याला विरोध केला.
Now you are constrained to prove to us that India will continue to be a free country.
You must consult the people before you make a new law or a new scheme. pic.twitter.com/u0De38bzk0
— Kamal Haasan (@ikamalhaasan) September 16, 2019
कोणताही शहा, सुलतान, सम्राट 1950 मध्ये जनतेला दिलेले आश्वासन मोडू शकत नाही, असे कमल हसन म्हणाले. 1950 मध्ये देश प्रजासत्ताक झाल्यावर प्रत्येक क्षेत्राची भाषा आणि संस्कृती वेगवेगळी आहे, त्याचा सन्मान करण्यात येईल आणि भाषा, संस्कृतीची जपणूक करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले होते. देशाच्या एकतेसाठी अनेक राजांनी आणि संस्थानांनी आपले राज्य सोडले. मात्र, आपली भाषा, संस्कृती आणि ओळख जनतेला कायम ठेवायची आहे. कोणत्याही परिस्थितीत जनतेला आपली संस्कृती जोपासायची आहे, असे ते म्हणाले. आपल्या देशातील विविधतेतच एकता आहे. त्यामुळे देशात एखादी गोष्ट लादणे योग्य नसल्याचे ते म्हणाले. देशात नवा कायदा किंवा योजना आणण्याआधी सरकारने जनतेशी संवाद साधणे अपेक्षित आहे. जलीकट्टू खेळासाठी फक्त निदर्शने करण्यात आली होती. मात्र, आता भाषा वाचवण्यासाठी जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. हिंदी भाषा निमित्ताने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हिंदी देशाची राजभाषा असून देशात सर्व व्यवहार होतील अशी एकच भाषा असावी, असे मत व्यक्त केले होते. त्यावर दक्षिणेकडील राज्यांनी विरोध प्रदर्शन सुरू केले आहे.



























































