
अपना सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष दत्ताराम चाळके यांच्या अपना बँक परिवार पॅनलचा प्रचंड मताधिक्याने विजय झाला. या पॅनलचे सर्वच्या सर्व 15 उमेदवार घवघवीत मते घेऊन विजयी झाले, तर विरोधकांना नगण्य मते मिळाली आहेत. गेली 35 वर्षे दत्ताराम चाळके यांचा सहकार क्षेत्राचा अनुभव आणि 15 वर्षांच्या त्यांच्या अध्यक्षपदावरील प्रगतशील कार्यावर मतदारांनी शिक्कामोर्तब केले आहे.
या विजयाबाबत चाळके म्हणाले, बँकेच्या विजयात सभासदांचा विश्वास आणि कार्यकर्त्यांची प्रचंड मेहनत यांचा सिंहाचा वाटा आहे. यामुळेच हा विजय मिळाला आहे. त्यांच्या विश्वासाच्या बळावर यापुढेही बँकेची घोडदौड सुरू राहील. गेल्या 15 वर्षांत कर्मचाऱयांची व संचालक मंडळाची साथ यामुळेच बँकेची प्रगती शक्य झाली आहे. या विजयाबद्दल चाळके यांनी मतदारांचे आभार मानले आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपनिबंधक जे. डी. पाटील यांनी काम पाहिले. त्यांचे सहाय्यक म्हणून दिलीप चव्हाण आणि तंत्रपाळे होते.



























































