संभाजी भिडे यांच्या हस्तकाकडून मुख्यमंत्र्यांनाच ठार मारण्याची धमकी!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भीमा-कोरेगावमध्ये अपेक्षित यश न मिळाल्यामुळे संभाजी भिडे यांच्या निकटच्या हस्तकाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच हत्येची धमकी दिली. रावसाहेब पाटील असे या हस्तकाचे नाव असून त्यांनी 1 जानेवारीलाच फेसबुकवर एक पोस्ट टाकून मुख्यमंत्री फडणवीस, पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट तसेच सुधींद्र कुलकर्णी यांना जीवे मारण्याची धमकी दिली, असा गौप्यस्फोट भारिप-बहुजन महासंघाचे नेते ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी केला.

प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेऊन हा गौप्यस्फोट केला. मुख्यमंत्र्यांच्या हत्येची धमकी देतानाच ही महाराष्ट्राला लागलेली कीड असून तिला कापलेले चांगले, असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटल्याचे आंबेडकर म्हणाले. हिंदुत्ववादी संघटनांमध्ये सुरू असलेल्या चढाओढीमुळे असले प्रकार घडत आहेत. आतातरी मुख्यमंत्र्यांनी अशा संघटनांकिरुद्ध कारवाई करावी आणि हिंदूंनीही अशा संघटनांपासून दूर राहावे, असे आवाहन त्यांनी केले. या पोस्टची माहिती पोलिसांच्या सायबर क्राईम सेलकडे होती; परंतु जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच सहाय्यक अधीक्षक यांनी ही माहिती मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचू दिली नसल्यामुळे या अधिकाऱ्यांविरुद्धही कारवाई केली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.

कबीर कला मंचाविरोधात गुन्हा
भीमा-कोरेगाव प्रकरणात हिंदुत्ववादी संघटनांकिरुद्ध दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांमुळे चिडलेल्या लोकांनी कबीर कला मंचाविरुद्ध गुन्हा दाखल केला असा दावा मंचच्या प्रमुख ज्योती जगताप यांनी या वेळी केला. जी गाणी आम्ही नेहमी म्हणतो तीच गाणी या कार्यक्रमात आम्ही सादर केली. त्यामुळे दंगल उसळण्यास कोणताही हातभार लागलेला नाही, असेही त्या म्हणाल्या.