माजी कसोटीवीर माधव आपटे यांचे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानचे माजी कसोटीपटू व उद्योजक माधव आपटे यांचे सोमवारी पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. ब्रीच कॅण्डी हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 86 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी आणि नातवंडे असा परिवार आहे. माधव आपटे यांच्या पार्थिवावर शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी वासू परांजपे, चंदू पाटणकर, सुनील गावसकर, दिलीप वेंगसरकर, हर्षा भोगले, मिलिंद रेगे, जतीन परांजपे यांच्यासह असंख्य क्रिकेटप्रेमींनी उपस्थित राहून माधव आपटे यांना श्रद्धांजली वाहिली.

माधव आपटे यांनी 1948 सालापासून क्रिकेट कारकीर्दीला सुरुवात केली. त्यांनी 20व्या वर्षी हिंदुस्थानसाठी पहिला कसोटी सामना खेळला. 1952 साली त्यांनी पाकिस्तानविरुद्ध हा सामना खेळला. माधव आपटे यांनी सात कसोटी सामन्यांमध्ये 49.27च्या सरासरीने 542 धावा फटकावल्या. वेस्ट इंडीज दौऱयात त्यांनी धावांचा पाऊस पाडला. पोर्ट ऑफ स्पेनमध्ये त्यांनी केलेल्या नाबाद 163 धावांच्या खेळीमुळे हिंदुस्थानला कसोटी सामना ड्रॉ राखता आला.

माधव आपटे हे डी. बी. देवधर व सचिन तेंडुलकर यांच्यासोबत खेळणारे एकमेव क्रिकेटपटू होते. ते बीसीसीआयचे संस्थापक सदस्यही होते. शिवाय त्यांनी क्लब्ज लेजंड क्लबचेही प्रमुखपद सांभाळले होते. आपटे हे मुंबई चेंबर्स ऑफ कॉमर्सचे अध्यक्षही होते.