शाळेला दांडी मारण्यासाठी विद्यार्थ्यांनी रचला अपहरणाचा डाव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक

मुरुडमधील पालकांची झोप उडवून देणाऱ्या दोन विद्यार्थ्यांच्या अपहरण प्रकरणाला नाट्यमय कलाटणी आली आहे.  तृतीयपंथीयांनी नव्हे तर या विद्यार्थ्यांनीच आपल्या स्वत:च्या अपहरणाचा बनाव रचल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. धक्कादायक म्हणजे शाळेत जायला कंटाळा आल्याने दांडी मारण्यासाठी आपण ही थाप मारल्याचे या विद्यार्थ्यांनी कबूल केले आहे.

मुरुड तालुक्यातील एकदरा गावातील दोन शाळकरी मुलांना काही तृतीयपंथीयांनी तोंडावर हात ठेवून जबरदस्तीने व्हॅनमध्ये कोंबून त्यांचे अपहरण करण्यात आल्याचा प्रकार चर्चेत आला होता.  त्यामुळे पालकवर्गही धास्तावला होता. या प्रकरणाची गंभीर दखल रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांनी घेऊन पोलीस उपविभागीय अधिकारी  नितीन जाधव व मुरुड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद तांबोळी, पोलीस उपनिरीक्षक प्रशांत सुबनावळ व त्यांच्या सहकाऱ्यांनी  या प्रकरणाचा छडा लावण्याची जबाबदारी दिली. तपास करताना प्रथम तृतीयपंथीयांची कसून चौकशी करण्यात आली. ज्या वाराला हा प्रकार घडला त्या दिवशी ते परिसरात फिरकलेच नव्हते. तर ज्या व्हॅनचा उल्लेख झाला, तशा वर्णनाची कोणतीच गाडी मुरुड-अलिबाग या मुख्य रस्त्यावर धावली नव्हती. त्यामुळे पोलिसांनी त्या विद्यार्थ्यांना विश्वासात घेऊन चौकशी केली असता मिळालेल्या माहितीने तपास अधिकारीही चक्रावले. शाळेत जाण्यास उशीर झाला होता व शाळेचा कंटाळा आला असल्याने आम्ही आमच्या आई-वडिलांना खोटे सांगितल्याचे त्यांनी यावेळी कबूल केले.

सोशल मीडियावर अफवा पसरवणाऱ्यांना तंबी

कोणत्याची घटनेची खातरजमा न करता रंगवून ती सोशल मीडियावर पसरवली जाते. यापुढे असा प्रकार घडल्यास कडक कारवाई केली जाईल, अशी तंबी रायगड पोलिसांनी दिली आहे.