मुंबईकरांना मिळणार एक हजार मेगावॅट वाढीव वीज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
electricity

मुंबापुरीची वाढती विजेची मागणी लक्षात घेता लवकरच एक हजार मेगावॅट वाढीव वीज मिळणार आहे. राज्यभरातून मुंबईत वाढीव वीज वाहून आणता यावी म्हणून विक्रोळी येथे नवीन सबस्टेशन उभारण्याचे काम टाटा पॉवरला दिले होते. मात्र 2015 पासून दोन वेळा मुदतवाढ देऊनही सर्वेक्षणापलीकडे काम गेलेले नाही. त्याची दखल घेत वीज आयोगाने सबस्टेशनचे काम करण्यासाठी महापारेषणला स्पर्धात्मक निविदा काढण्याचे आदेश दिले होते. त्याविरोधात टाटा पॉवरने केंद्रीय अपिलीय प्राधिकरणाकडे धाव घेतली होती. मात्र तेथेही टाटा पॉवरची याचिका फेटाळल्याने आता सबस्टेशनच्या कामाचा मार्ग मोकळा झाला आहे.

मुंबईची विजेची कमाल मागणी साडेतीन हजार मेगावॅट असून वर्षाला त्यामध्ये दीडशे मेगावॅटची भर पडत आहे. मात्र आज मुंबई परिसरातील वीज केंद्रांमधून सुमारे 1700 मेगावॅट वीज उपलब्ध होत असून टाटा पॉवरच्या खोपोली जलविद्युत प्रकल्पातून सुमारे चारशे मेगावॅट वीज आणली जाते. तर राज्यभरातून महापारेषणच्या वीजवाहिन्यांमधून सुमारे 1500 मेगावॅट वीज आणली जाते. त्यामुळे सध्याची कमाल मागणी पूर्ण होत असली तरी भविष्यात वाढणारी मागणी पूर्ण करण्यासाठी विक्रोळी येथे 440 केव्हीचे सबस्टेशन उभारण्याचे काम वीज आयोगाने टाटा पॉवरला दिले होते. त्यानुसार दोन वेळा मुदतवाढ देऊनही  काम पूर्ण झालेले नाही. मात्र मुंबईची विजेची वाढती गरज लक्षात घेत वीज आयोगाने वर्षभरापूर्वी टाटा पॉवरकडील काम काढून घेत महापारेषणला स्पर्धात्मक निविदा मागवून काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते. त्याला टाटा पॉवरने केंद्रीय अपिलीय वीज प्राधिकरणाकडे आव्हान दिले होते. त्यामुळे गेल्या दहा महिन्यांपासून काम ठप्प आहे. मात्र आता प्राधिकरणानेच टाटाची याचिका फेटाळल्याने सबस्टेशनच्या कामाला वेग येणार आहे.

विजेचा पुरवठा साडेचार हजार मेगावॅटवर जाणार
मुंबईत सध्या टाटा पॉवर आणि अदानी इलेक्ट्रिसिटीकडून सुमारे 2100 मेगावॅट वीज पुरवली जात आहे, तर महापारेषण आपल्या वीजवाहिन्यांच्या माध्यमातून दीड हजार मेगावॅट वीज राज्यभरातून वाहून आणते. मात्र 400 केव्हीचे विक्रोळी सबस्टेशन उभे राहिल्यानंतर 1000 मेगावॅट अतिरिक्त वीज राज्यभरातून आणणे शक्य होणार आहे. त्यामुळे मुंबईला विजेचा एकूण पुरवठा साडेचार हजार मेगावॅटपर्यंत जाणार आहे.