
1980-90 च्या दशकात लहान मुलांच्या आवडत्या चॉकलेट्सपैकी एक असलेल्या पारले कंपनीच्या रोला कोलाच्या गोळ्या पुन्हा एकदा बाजारात येणार आहेत. तब्बल 13 वर्षांनी या गोळ्यांचे उत्पादन कंपनीने सुरू केले आहे. येत्या वर्षभरात या गोळ्यांची तब्बल 100 कोटींची विक्री करण्याचा कंपनीचा निर्धार आहे.
YOU asked, we listened. India’s most loved cola ka gola is back with a bang! Get your pack today! #RolaColaIsBack pic.twitter.com/IokRIrsNtT
— Parle Products (@ParleFamily) October 1, 2019
रोला कोलाच्या गोळ्या या लहान मुलांमध्ये खूप प्रसिद्ध होत्या. मात्र कालांतराने बाजारातील वाढत्या चॉकलेट्सच्या शर्यतीत या गोळ्या मागे पडल्या. त्यामुळे पारले कंपनीने 2006 मध्ये रोला कोलाचे उत्पादन थांबवले होते. या वर्षी फेब्रुवारी महिन्यात एका नेटकऱ्याने ट्विट करत रोला कोलाच्या गोळ्या बाजारात पुन्हा आणण्याची मागणी पारले कंपनीकडे केली होती. त्या ट्विटला मोठ्या प्रमाणात नेटकऱ्यांचा पाठिंबा मिळाला होता. तब्बल दहा हजार लोकांनी रिट्विट केले होते. त्यानंतर पारले कंपनीने देखील लोक आग्रहास्तव रोला कोलाच्या गोळ्यांचे उत्पादन सुरू केलं आहे. सप्टेंबरमध्ये या गोळ्यांचे उत्पादन सुरू करण्यात आले असून ऑक्टोबर महिन्यात देशभरातील पाच लाख दुकानांपर्यंत या गोळ्या पोहचवल्या जाणार आहेत.



























































