
>> आशुतोष बापट
या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता, नमस्तस्यै, नमस्तस्यै, नमस्तस्यै नमो नमः शक्तिदेवता अर्थात देवी, अज्ञानाचा अंधकार दूर करून भक्तांचे आयुष्य उजळून टाकते. देवी या संकल्पनेची व्याप्ती खूप मोठी आहे. अनेक लोककथा, लोकगीते यातून ती वारंवार प्रकट होत असते. सर्वसामान्य जनतेला ती अत्यंत जवळची वाटणारी देवता आहे. प्रत्यक्ष आई असेच तिला संबोधन असल्यामुळे तिच्याशी असलेले नाते विलक्षण आहे.
सरस्वती
विद्येची देवता असलेल्या सरस्वतीच्या मूर्ती तुलनेने फार थोडया प्रमाणावर दिसतात. सरस्वतीची स्वतंत्र मंदिरे तर अगदीच दुर्मिळ म्हणायला हवीत. वीणावादन करणारी, हंसावर अथवा मोरावर आरूढ असलेली देवी सरस्वती ही ब्रह्मा, गणपती यांच्यासोबत दाखवली जातेच, पण काही ठिकाणी ती गणपतीच्या सोबतही दाखवली जाते. एकटय़ा सरस्वतीच्या स्वतंत्र आणि अत्यंत देखण्या अशाही मूर्ती आहेत त्यातलीच एक म्हणजे हळेबिडूच्या मंदिरावर असलेली नृत्य करणारी सरस्वती. अत्यंत आकर्षक आणि ठसठशीत सरस्वती होयसळेश्वर मंदिरावर आहे. दहा हात असलेली ही सरस्वती त्रिभंग स्थितीत दाखवली आहे. तिच्या हातात अक्षमाला, परशू, स्रुक, पुस्तक, मातुलुंग असून काही हात हे नृत्यमुद्रेत दाखवले आहेत. देवीचा मुकुट आणि कमरेची वस्त्रs अत्यंत सुंदर आहेत. पायाशी हंस असून शेजारी वादक विविध वाद्ये वाजवताना दाखवले आहेत. विद्येची ही देवता नृत्याचीसुद्धा अधिष्ठात्री आहे असेच जणूकाही शिल्पकारांना सुचवायचे असावे. अशीच दुसरी तितकीच सुंदर देवी मराठवाडय़ात औंढय़ा नागनाथच्या जवळ राजापूर गावी आहे. एका मंदिराच्या बाजूला ही मूर्ती ठेवलेली आहे. उभ्या त्रिभंग अवस्थेत असलेली ही देवी निव्वळ देखणी आहे.
गजलक्ष्मी
कमलासनावर बसलेली देवी, तिच्या दोन बाजूंना दोन उभे हत्ती, त्यांच्या सोंडेमधे पाण्याने भरलेल्या दोन घागरी, ते हत्ती घागरीमधले पाणी देवीच्या डोक्यावर ओतत आहेत असे शिल्प आपल्याला अनेकदा बघायला मिळते. हिलाच अभिषेकलक्ष्मी अथवा गजलक्ष्मी असे संबोधले जाते. लक्ष्मी, हत्ती ही संपत्ती, ऐश्वर्याची प्रतीके मानली गेली आहेत. तद्वत लक्ष्मीचा पृथ्वीशी आणि हत्तींचा मेघाशी संबंध जोडलेला बघायला मिळतो. मेघांच्या द्वारे केलेला धरतीला जलाभिषेक हेसुद्धा या मूर्तीमधून कलाकारांना दाखवायचे असते. गजलक्ष्मीच्या सुंदर मूर्ती आपल्याला विविध ठिकाणी बघायला मिळतात. त्यातली नितांतसुंदर आणि त्रिमितीचा भास करून देणारी भव्य अशी मूर्ती वेरूळच्या कैलास लेण्यांच्या प्रवेशापाशीच आहे. कैलास लेण्यात प्रवेश केल्यावर समोरच आपल्याला अत्यंत भव्य, देखणे असे गजलक्ष्मीचे शिल्प सामोरे येते. इथे बसलेल्या देवीच्या डोक्यावर हत्ती पाण्याचे कलश रिते करताहेत, देवी एका जलाशयात फुललेल्या कमळावर बसलेली आहे आणि त्या जलाशयात निर्माण होणाऱया लाटासुद्धा या प्रतिमेत दाखवलेल्या आहेत. त्या लाटांमुळे त्या शिल्पाला त्रिमितीचा भास निर्माण होतो. इतके देखणे शिल्प क्वचितच दुसरीकडे असेल. गडचिरोली जिह्यातल्या मार्कंडी इथल्या मंदिरावरसुद्धा गजलक्ष्मीचे असेच सुंदर शिल्प पाहायला मिळते. कोकणात ही शिल्पे आश्चर्य वाटावे एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर बघायला मिळतात. कोकणात गजलक्ष्मीला ‘भावई’ असे म्हटले जाते. म्हणजे मूर्ती तीच, पण तिचे नाव भावई देवी. सिंधुदुर्ग जिह्यात गोठोस या गावी या देवीचे अतिशय सुबक आणि आकर्षक शिल्प मंदिरात ठेवलेले आहे. तसेच गोव्यातसुद्धा वळवई या गावाची ग्रामदेवता म्हणून याच भावईची अतिशय सुंदर मूर्ती बघायला मिळते. कोकणात अनेक मंदिरांच्या आवारात हे गजलक्ष्मीचे शिल्प ठेवलेले दिसते. कदाचित जुन्या कुठल्या मंदिरावरील हे शिल्प आता मात्र ऊन-पाऊस झेलत उभे असते. याचे उदाहरण म्हणजे चिपळूण इथल्या भैरव मंदिराच्या बाहेर असेच सुंदर शिल्प बाजूला ठेवलेले आहे. पुणे जिह्यातील प्राचीन नाणेघाटाच्या तोंडाशी गजलक्ष्मीचे एक काहीसे भग्न शिल्प आहे. तसेच हरिश्चंद्रगडावर जाताना टोलार खिंडीत गजलक्ष्मी आपल्याला दर्शन देते.
नृत्यमग्न सप्तमातृका – मुखेड
वैशिष्टय़पूर्ण सप्त मातृका असणारे अजून एक ठिकाण आहे ते म्हणजे नांदेड तालुक्यातील मुखेड गावचे महादेव मंदिर. या मंदिरावर आहेत अत्यंत दुर्मिळ अशा नृत्य करणाऱया सप्तमातृका. प्राचीन हिंदुस्थानी समाजात मातृदेवतेची पूजा प्रचलित होतीच. शिल्पकारांना अर्थातच या सप्तमातृकांचे अंकन करण्याचा मोह झाला होता. एका ओळीमध्ये बसलेल्या या मातृका आणि त्यांच्या पायाशी असलेली त्याची वाहने असे शिल्प अनेक ठिकाणी पाहायला मिळते, परंतु मुखेडच्या महादेव मंदिराच्या बाह्यांगावर यातली प्रत्येक मातृका ही अत्यंत डौलदारपणे नृत्य करताना शिल्पित केलेली आहे. दुर्दैवाने यातील काही शिल्पांचे हात भंगलेले आहेत तरीसुद्धा त्यांच्या शरीराचा डौल अत्यंत आकर्षक दाखवला आहे. नृत्य करताना शरीराला आलेला बाक आणि लयबद्धता त्या मूर्तिकारांनी इतकी अचूक दाखवली आहे की प्रत्यक्ष नृत्याचा भास झाल्याशिवाय राहत नाही. त्या प्रत्येक मातृकांच्या पायाशी एक कमळाचे फूल असून त्यामध्ये त्यांचे वाहन शिल्पित केलेले दिसते. त्या वाहनावरून त्या मातृकांची ओळख पटते. नृत्यरत अवस्थेमधील या सप्तमातृकांच्या डोक्यावर मुकुट असून कानात कुंडले आहेत. त्यांचे अधोवस्त्र मेखलेने बांधलेले असून वस्त्राचा सोगा दोन्ही पायामध्ये रुळताना दिसतो आहे. काही मातृकांच्या पायात तोडे आणि पैंजण यांसारखे अलंकारदेखील दिसतात. अत्यंत दुर्मिळ असा हा शिल्पठेवा आपल्या महाराष्ट्रात आहे ही खरेच अभिमानाची गोष्ट म्हणायला हवी.
देवी आपल्या भक्तांना विविध रूपात दर्शन देत आज वर्षानुवर्षे उभी आहे. कधी ती बौद्धांची हारिती होते तर जैनांची अंबिका होते. वेरूळ लेण्यात आम्रवृक्षाखाली बसलेल्या अंबिका या देवीची अतिशय सुंदर मूर्ती आहे. तिच्या शेजारी तिचे वाहन असलेला सिंहदेखील दाखवलेला आहे. आदिवासी जमातीमध्ये ती गावाच्या सीमेवरील एखाद्या गोल दगडाच्या स्वरूपात असते तर कधी ती एखाद्या लाकडाच्या ओबडधोबड मूर्तीच्या रूपात असते. गावाचे, वस्तीचे रक्षण करणारी ती गावदेवी होते. देवीप्रति असलेल्या आई या नात्यातून कलाकारांनी तिची एकापेक्षा एक अप्रतिम शिल्पे घडवली. तिला नटवले, सजवले आणि पुन्हा तिच्याच समोर नतमस्तकही झाले. कोणी कलाकार आपल्या हातातल्या छिन्नी-हातोडय़ाने एखाद्या दगडाला देवीचा आकार देत असतो. निराकारातून तो आपल्या कलेच्याद्वारे देवीची मूर्ती घडवतो आणि मग मूर्तिमंत देवी समोर उभी राहिल्यावर तिला म्हणतो ‘यादेवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता, नमस्तस्यै, नमस्तस्यै, नमस्तस्यै नमो नमः’























































