लातूर रोडजवळ व्यापाऱ्यास मारहाण करुन लुटले, अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चाकूर येथील आठवडी बाजारात चप्पल, बुट विक्री करणाऱ्या व्यवसायिकास लातूर रोड येथे रात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास चौघांनी मारहाण करुन लुटल्याची घटना घडली. या प्रकरणी अज्ञात चारजणांविरुद्ध चाकूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लातूर शहरातील महादेव नगर येथील एकबाल यासीनसाब शेख यांनी चाकूर पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल केली. मालवाहू टाटा जीप (क्रमांक एम.एच.24 एफ 8717) हे वाहन घेऊन ते चाकूर येथील आठवडी बाजारात चप्पल, बूट विक्री करण्यासाठी गेलेले होते. रात्री लातूरला परत येत असताना लातूररोडवरील रेल्वे उड्डाणपुलाच्या थोडे पुढे आल्यानंतर खड्यामुळे गाडीच्या एका चाकाचे रिंग बेंड झाले. लातूर येथील दुरुस्ती करणाऱ्या मेकॅनिकने आता सकाळी दुरुस्ती करतो असे सांगितले म्हणून फिर्यादी व त्याच्यासोबत असणारा साजीद कौसर शेख हे दोघे जीपच्या केबीनमध्ये बसले.

रात्री साडे बारा वाजण्याच्या सुमारास एम.एच.24 ई 5587 या ऑटोमधून आलेल्या चौघांनी फिर्यादीस रस्त्यावर गाडी का थांबवलास म्हणून शिवीगाळ केली. हाताने मारहाण करुन त्याच्या खिशातील मालाची विक्री करुन आलेले 10 हजार रुपये आणि 17 हजार 500 रुपये किमतीचा एक मोबाईल जबरदस्तीने काढून घेतला व निघून गेले. चाकूर पोलीस ठाण्यात अज्ञात चारजणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.