
मुसळधार पावसामुळे टिळक रस्त्यावरील वायरलेस व्हॅनवर (पीएमपीएल) झाड कोसळून झालेल्या दुर्घटनेत चालकाचा मृत्यू झाला. रस्त्यावरील सर परशुराम महाविद्यालय परिसरात ही घटना घडली. विजय ऊर्फ बंडू नवगणे (50) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी दत्तवाडी पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत घटनेची नोंद करण्याचे काम सुरू होते. बुधवारी सायंकाळी पीएमपीएलची एक बस एसपी कॉलेज परिसरात बंद पडली होती. या बसच्या दुरुस्तीसाठी एक बेकडाऊन व्हॅन (वायरलेस) त्या ठिकाणी दाखल झाली. या बसमध्ये एक फिटर आणि चालक म्हणून नवगणे होते. नवगणे यांनी ग्राहक पेठ दुकानाशेजारी रस्त्याच्या कडेला बस उभी केली. यादरम्यान शहरात वादळी वाऱ्यासह मोठय़ा प्रमाणात पाऊस सुरू झाला. काही वेळातच एक मोठे झाड व्हॅनच्या पुढच्या बाजूला कोसळले. यावेळी नवगणे हे बसमध्ये अडकले गेले.




























































