
देशाची राजधानी असलेल्या नवी दिल्लीत चोरांचा सुळसुळाट असुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुतणीला नुकताच याचा अनुभव आला आहे. दिल्लीतील उच्चभ्रूंची वसाहत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिव्हील लाईन्स भागात स्कूटीवरुन आलेल्या चोरट्यांनी मोदी यांच्या भावाची मुलगी दमयंती बेन हीच्या हातातून पर्स खेचून पळ काढला. पर्समध्ये हजारो रुपयांची रोख रक्कम व महत्वाची कागदपत्रे होते. याप्रकरणी दमयंती बेन यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
दमयंती बेन शनिवारी सकाळी अमृतसरहून दिल्ली येथे आल्या होत्या. त्यांच्यासाठी सिव्हिल लाईन्स परिसरातील गुजराती भवनमध्ये एक रुम बुक करण्यात आला होता. यामुळे जुनी दिल्ली येथून रिक्षातून त्या आपल्या कुटुंबासह गुजराती भवन येथे पोहचल्या. भवनच्या प्रवेशद्वारावर रिक्षातून त्या उतरत असतानाच अचानक स्कुटीवरुन आलेल्या दोन जणांनी त्यांच्या हातातली पर्स खेचली व पळ काढला. पर्समध्ये 56 हजार रुपयांची रोख रक्कम , दोन मोबाईल आणि काही महत्वाची कागदपत्रे होती. तसेच संध्याकाळच्या फ्लाईटने त्यांना अहमदाबाद येथे जाय़चे आहे. पण महत्वाच्या कागदपत्रांचीच चोरी झाल्याचे दमयंती यांनी तक्रारीत म्हटले आहे.
विेशेष म्हणजे सिव्हिल लाईन्स सारख्या ज्या व्हीव्हीआयपी भागात चोरी झाली तो भाग दिल्लीच्या लेफ्टनंट गव्हर्नरच्या घरापासून हाकेच्या अंतरावर आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचे निवासस्थानही काही पावलांवर आहे. यामुळे दिवसाढवळ्या झालेल्या या चोरीच्या घटनेने दिल्लीतील कायदा व सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

























































