
‘काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारच्या काळात मराठा समाजाला आरक्षणाबाबत फक्त भूलथापा देण्यात आल्या. युती सरकारने मात्र मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण दिले आहे. त्यामुळे आता मराठा समाजाने शिवसेना-भाजप महायुतीच्या उमेदवारांना मतदान करावे, असे आवाहन गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार साहेबराव नवले पाटील यांच्या प्रचारासाठी संगमनेर तालुक्यातील चिकणी येथे आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शामसुंदर जाजू, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख आप्पा केसकर, तालुकाप्रमुख जनार्दन आहेर, माजी नगरसेवक राधावल्लभ कासट, पंचायत समिती सदस्य अशोक सातपुते, अमोल खताळ, अविनाश थोरात, कैलास वाकचौरे, शर्मिला येवले, भरत फटांगरे, शाळीग्राम होडगर, जयवंत पवार, शरदनाना थोरात, संजय फड, सदाशिव थोरात आदी उपस्थित होते.
विखे पाटील म्हणाले की, आघाडी सरकारने मराठा समाजाला आरक्षणाच्या संदर्भात नेहमीच झुलवत ठेवले. युती सरकारने मात्र याबाबत निर्णय घेऊन मराठा समाजाला आरक्षण दिले. हे आरक्षण न्यायालयात पण टिकले. तसेच धनगर समाजालाही ही मोठ्या प्रमाणात सवलती दिल्या आहेत. मराठा समाजाने आता महायुतीच्या उमेदवारांच्या पाठीशी उभे राहणे आवश्यक आहे. संगमनेर तालुक्यात विकासाचा दिंडोरा पिटला जातो परंतु तालुक्यातील अनेक गावे दुष्काळी आहेत. चाऱ्यांचे पाणी काही गावांमध्ये पोहोचू दिले जात नाही. पण इथून पुढे सर्वांना पाणी मिळवून देण्याचे काम युती सरकार करणार आहे. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून अनेक जण शिवसेना भाजप मध्ये प्रवेश करत आहेत. शेवटी तुम्हाला फक्त दोन्ही पक्षाचे प्रदेशाध्यक्ष त्या पक्षात राहिले दिसतील अशी टीका विखे यांनी केली.



























































