पोषण आहार स्वयंपाकी, मदतनीसांचे मानधन थकले! दिवाळीपूर्वी देण्यासाठी निवेदन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

रायगड जिल्ह्यातील प्राथमिक शाळांच्या शालेय पोषण आहार योजनेंतर्गत स्वयंपाकी व मदतनीस पदांवर कार्यरत कर्मचार्‍यांना जून 2019 पासून मानधन देण्यात आलेले नाही. सदर मानधनाची रक्कम दिवाळीपूर्वी जमा करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग संघटनेने मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

शासन निकषानुसार अनुदानाच्या निकषावर पात्र ठरलेल्या अंशतः/टप्पा अनुदानित प्राथमिक शाळांमध्ये शालेय पोषण आहार योजना 24 नोव्हेंबर 2003 पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी रोजी लागू करण्यात आली. 2008 मध्ये सदर योजनेमध्ये सहावी ते आठवीच्या समावेश करण्यात आला.

रायगड जिल्ह्यात 2 हजार 672 मदतनीस, प्राथमिक शाळांमध्ये आणि 361 कर्मचारी, माध्यमिक अनुदानित शाळांमध्ये स्वयंपाकी व मदतनीस पदांवर कार्यरत आहेत. प्राथमिक शाळेतील मदतनिसांना दरमहा रु. 1500 पगार देण्यात येतो. दरमहा रु.40 लाख 8 हजार प्रमाणे जून 19 पासून ऑक्टोबर महिन्याअखेर एकूण रु. 2 कोटी 40 हजार रक्कम कर्मचार्‍यांना अद्याप देण्यात आलेली नाही. अनुदानित माध्यमिक शाळांमध्ये एकूण 361 कर्मचारी असून दरमहा 3 हजार रुपये मानधन देण्यात येते. दरमहा रु. 10 लाख 83 हजार प्रमाणे जून 2019 पासून ऑक्टोबर महिना अखेरीस 54 लाख 15 हजार रुपये रक्कम देण्यात आलेली नाही.

प्राथमिक आणि माध्यमिक एकत्रित 2 कोटी 54 लाख 55 हजारचे मानधन जिल्हा परिषदेकडून सदर कर्मचार्‍यांना देण्यात आलेले नाही. सदर मानधन दिवाळीपूर्वी देण्यात यावे अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. मानधन दिवाळीपूर्वी न मिळाल्यास जिल्हा परिषदेच्या कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. सदर मानधनाची रक्कम 60 टक्के केंद्र हिस्सा आणि 40 टक्के राज्य हिस्सा अशी तरतूद मंजूर आहे. राज्य शासनाच्या हिश्श्यामध्ये रु. 500 ची वाढ 23 जानेवारी 19 च्या शासन निर्णयानुसार करण्यात आली आणि स्वयंपाकी तथा मदतनीस यांचे मानधन एप्रिल 19 पासून रु. 1500 दरमहा करण्यात आले.