जनतेचा पैसा लुटणाऱयांची तुरुंगवारी सुरूच राहणार!- मोदींचा काँग्रेस आघाडीवर हल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशातील गरीब, मध्यमवर्गीय लोकांच्या कष्टाचे पैसे ज्यांनी लुटले आहेत, त्यांना आम्ही तुरुंगात धाडले. जनतेला लुटणाऱयांची तुरुंगवारी अजून थांबलेली नाही, हा सिलसिला सुरूच राहणार आहे. जनतेच्या लुटलेल्या पैशाची पै-पै वसूल होत नाही, तोपर्यंत जनतेचा हा सेवक स्वस्थ बसणार नाही, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर सभेत दिला. विधानसभा निवडणुकीसाठी पुणे शहर आणि जिह्यातील भाजप-शिवसेना महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स.प. महाविद्यालयाच्या मैदानावर प्रंचड जाहीर सभा झाली.

मोदी यांनी 35 मिनिटांच्या भाषणात देशाची अर्थव्यवस्था, विकासकामे, 370 कलम, पुण्याच्या विकासाबद्दल बोलतानाच त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर जोरदार हल्ला चढविला. दुसरीकडे सातारा लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा निवडणूक प्रचारार्थ येथील सैनिक स्कूलच्या मैदानावर आयोजित विराट जाहीर सभेतही मोदींनी काँग्रेस आघाडीचा चांगलाच समाचार घेतला. विरोधक लोकभावना समजून घेत नसल्याने लोकसभा निवडणुकीत जनतेने त्यांचा सफाया केला. यावेळी त्यांची अवस्था आणखी बिकट झाली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीतच बिघाडी आहे. त्यांच्यात आपापसातच भांडणे सुरू आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीमध्येच अशी फाटाफूट असेल तर ते राज्याला काय दिशा देणार, असा जळजळीत सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सातारा येथे केला.

सातारा ही माझ्यासाठी गुरुभूमी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात छत्रपती संभाजी महाराज, शाहू महाराज, रामदास स्वामी, सावित्रीबाई फुले, क्रांतिसिंह नाना पाटील यांचा आवर्जून उल्लेख केला. यशवंतराव चव्हाण यांच्यासारखे व्हिजनरी नेतृत्व या जिह्याने देशाला दिले, असे सांगून सातारा ही माझ्यासाठी एका अर्थाने गुरुभूमीदेखील आहे. खटाव येथील लक्ष्मणराव इनामदार हे आपले गुरू होते. त्यांना आम्ही वकीलसाहेब म्हणायचो. त्यांची जन्मभूमी सातारा असली तरी कर्मभूमी गुजरात होती. शिक्षण आणि अनुग्रह देऊन त्यांनी आम्हाला घडविले. त्यामुळे साताऱयाला येणे हे माझ्यासाठी तीर्थयात्रेसारखेच आहे, असे जेव्हा मोदी म्हणाले तेव्हा उपस्थितांनी टाळ्यांचा जोरदार कडकडाट केला.