इक्बाल मिर्ची कनेक्शन, प्रफुल्ल पटेल यांची ‘ईडी’कडून 11 तास चौकशी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गँगस्टर दाऊद इब्राहिमचा जवळचा साथीदार इक्बाल मिर्चीबरोबरच्या मालमत्ता खरेदी व्यवहारामुळे संकटात सापडलेले माजी केंद्रीय मंत्री, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांची शुक्रवारी ‘ईडी’ने 11 तास चौकशी केली. ईडीच्या दोन अधिकाऱ्यांनी वरळीतील सीजे हाऊससंबंधी त्यांच्यावर प्रश्नांचा भडिमार केला. त्याला उत्तर देताना पटेल यांनी स्वतःवरील सर्व आरोपांचे खंडन केले.

बॅलार्ड पिअर येथील ईडीच्या कार्यालयात पटेल हे शुक्रवारी सकाळी 10.30 च्या सुमारास गेले होते. पुढील 11 तास चौकशीला सामोरे गेल्यानंतर ते ईडीच्या कार्यालयातून बाहेर पडले. मिर्चीशी आपला काहीच संबंध नसल्याचा दावा त्यांनी या चौकशीदरम्यान केला. मिर्चीबरोबरचा मालमत्ता खरेदी व्यवहार रजिस्ट्रारसमोर केला होता. त्याची सर्व कागदपत्रे जिल्हाधिकाऱ्यांपुढे ठेवली होती. जर मिर्ची दोषी होता तर प्रशासनाने त्याच वेळी व्यवहार थांबवायला हवा होता असे म्हणणेही पटेल यांनी मांडल्याचे समजते.