Mile Stone नाटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> क्षितिज झारापकर ([email protected])

कुसुम मनोहर लेले. 90 च्या दशकातील ज्वलंत, सामाजिक नाटक. आज पूर्णपणे नव्या संचात पुन्हा त्याच दिमाखात उभे राहिले आहे.

नाटक दोनदा पाहावंसं वाटणं ही नाटय़व्यवसायाच्या दृष्टीने खूपच चांगली गोष्ट आहे. एक नाटक पूर्वी असंच दोनदा पाहावंसं वाटण्याजोगं येऊन गेलं होतं. कारण त्यातील दोन प्रमुख पात्रं प्रत्येक नटाला भुरळ घालतील अशी होती. दोन मातब्बर नटांनी दोन्ही पात्रं करण्याचा हट्ट धरला आणि दिग्दर्शकाने एक नामी शक्कल लढवली. दोघांनाही आलटून पालटून प्रयोगागणिक ती पात्रं साकारू दिली. त्यामुळे प्रत्येक प्रयोग वेगळा होऊ लागला आणि प्रेक्षकांना दुसरा नट पहिली भूमिका किंवा पहिला नट दुसरी भूमिका कशी करतो हे पाहण्याची उत्सुकता लागली. आज बऱयाच वर्षांनी तेच नाटक पुन्हा रंगभूमीवर आलं आहे. पुन्हा एकदा सध्याचे दोन आघाडीचे नट त्या दोन भूमिका आलटून पालटून करताहेत. आता समीक्षक म्हणून आली का पंचाईत! दोन्ही नटांच्या दोन्ही भूमिका न पाहता समीक्षा करणं हे योग्य नाही. म्हणून ‘कुसुम मनोहर लेले’ हे नाटक दोनदा पाहून हे समीक्षण करण्यात येत आहे.

एखाद्या नाटकातल्या दोन भूमिका एका नटाला खुणावतात तेव्हा त्या नाटकाचं लिखाण निश्चितपणे चांगलं झालेलं असलं पाहिजे. अशोक समेळ या ज्येष्ठ रंगकर्मींनी लिहिलेलं ‘कुसुम मनोहर लेले’ हे एक उत्तम नाटक आहे. ऐंशीच्या दशकातल्या पेव फुटलेल्या लग्न जमवणाऱया संस्थांमधील एका सत्य कारस्थानावर हे नाटक बेतलेलं आहे. मुळात समेळ स्वतः नट, लेखक, दिग्दर्शक असल्याने त्यांना नाटक क्राफ्ट कसं करायचं याची जबरदस्त समज आहे. त्यात त्यांच्यावर मराठी नाटकांच्या क्राफ्टिंगचे महामेरू मानल्या जाणाऱया वसंतराव कानेटकरांचे संस्कार. म्हणूनच ‘कुसुम मनोहर लेले’मध्ये आपल्याला हे सगळं मिळतं. गेल्या शतकाच्या शेवटचा मध्यम लयीतला मेलोड्रामा अचूकपणे मांडत समेळ हा खेळ मांडतात. यावेळेस प्रदीप मुळ्ये हे नेपथ्यकार नाटकाला दिग्दर्शक म्हणून लाभलेत. मुळात मुळ्ये हे कमर्शियल आर्टिस्ट असल्याने पिंडाने ते व्हिज्युअल डिझायनर आहेत. ‘कुसुम मनाहेर लेले’मध्ये प्रदीप मुळ्ये आपल्याला नाटक वेगवेगळ्या फ्ऱेम्समधून दाखवतात. त्यांच्या सगळ्या फ्ऱेम्स या चित्रकाराच्या वाटतात आणि त्या रम्यतेत आपण हरवतो. शिवाय मुळ्यांनी हे मुळात ड्रमॅटिक असलेलं नाटक आताच्या पिढीसाठी सस्पेन्स थ्रिलर थाटात योजलं आहे. तीन अंकांचे दोन अंकी करताना त्यांनी नव्याने योजलेला मध्यांतराचा बिंदू चलाख आहे, पण मूळचे प्रायोगिक धाटणीचे मुळ्ये डिटेलिंगही खूप करतात. पुढे जेव्हा कळतं की, भाच्या हे पात्र सुरुवातीपासून सुजाता देशमुखच्या मागावर होतं तेव्हा पहिल्या प्रसंगात भाच्याची सायकलवरून केलेली मागच्या बाजूची पासिंग का केली हे उमगतं आणि बरं वाटतं. समेळ आणि मुळ्ये या दोघांनी मिळून ‘कुसुम मनोहर लेले’ हे आजचं नाटक करण्याचा यशस्वी प्रयत्न केलेला आहे. समेळांनी काही प्रवेश नव्याने लिहिले आहेत आणि मुळ्यांनी त्यांचंच आधीचं नेपथ्य बदलून अधिक भव्य आणि उपयुक्त केलेलं आहे. अशोक पत्कींचं संगीत ‘कुसुम मनोहर लेले’ला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवत असे. त्यातले आधीचे काही सिग्नेचर सूर तसेच ठेवत त्यांनी या वेळेलाही नाटकास पूरक असं संगीत दिलेलं आहे.

mile-stone

आता या नाटकाच्या विषयाकडे वळूया. ज्या कारणामुळे हे नाटक दोनदा पहावं लागलं ते कारण ‘कुसुम मनोहर लेले’ या नाटकाचं वेगळेपण आहे. मनोहर लेले आणि भाच्या खोटे या नाटकातील दोन भूमिका. एक सुरुवातीला सालस, बावळट मध्यमवर्गीय माणसाची जो उत्तरार्धात एक छद्मी, कावेबाज खलनायक निघतो तर दुसरी एका राकट, उद्धट गुंडाची जो उत्तरार्धात कैवारी ठरतो. साहजिकच शशांक केतकर आणि संग्राम समेळ या दोन्ही नटांना दोन्ही भूमिका कराव्याशा वाटणार. दोघे दोन्ही भूमिका करतात. शशांकचा लेले जरा पॉलिश्ड आहे तेथे संग्रामचा भाबडा आहे. लेलेचं खरं रूप येतं तिथे शशांक अधिक सामंजस्याने समोर येतो तिथे संग्राम ताठरपणे पुढय़ात उभा ठाकतो. भाच्याचा रांगडेपणा शशांक अधोरेखित करतो तिथे संग्राम बेगडीपणातून भाच्या खुलवतो. दोघे आपापल्या पद्धतीने दोन्ही भूमिका वठवतात आणि इथे नट आणि दिग्दर्शक जिंकतात. दिग्दर्शकाने पात्र डाईन न करता नटांच्या सुपूर्त केली आहेत आणि दोन्ही नटांनी आपली बुद्धिमत्ता आणि सेन्सिटिव्हिटी राखून ती पात्रं वेगळी वेगळी उभी केली आहेत. ‘कुसुम मनोहर लेले’ इथेच कौतुकास्पद आहे.

सुजाता देशमुखच्या भूमिकेत पल्लवी पाटील ही गुणी अभिनेत्री खूप परिणामकारक आहे. एकांकिका आणि प्रयोगिक नाटकांच्या मुशीतून आलेली पल्लवी सुजाताचे वेगवेगळ्या स्थितीतले भाव सहजपणे दाखवते. काही रोमॅटिंक प्रसंगात तर एका अनूभवातून गेल्याचा पोक्तपणाही फार छान येतो. कुसुम झालेली किरण राजपूतही आपली भूमिका व्यवस्थित साकारते. सुयोग विवाह संस्थेचं जोशी दांपत्य मानसी मागीकर आणि सतीश जोशी परफेक्ट उभं करतात. खरं या दोन्ही भूमिका ‘कुसुम मनोहर लेले’मध्ये महत्त्वाच्या आहेत.  मानसी आणि सतीश भूमिकांना योग्य न्याय देतात. प्रियांका कासलेची सुमनसुद्धा परिणामकारक झालेली आहे.

महाराष्ट्र रंगभूमीतर्फे संतोष कोचरेकर निर्मित ‘कुसुम मनोहर लेले’ हे खरोखर एक दिमाखदार नाटक आहे. हल्लीच्या गतिमान कथानकांच्या नाटकांच्या मांदियाळीत हे नाटक लीलया बसतं. मुळात विनीता ऐनापुरे यांच्या कथेतच ती गती आहे. त्यात समेळांनी केलेली भर आणि मुळ्यांनी दिलेलं दृष्यरूप नाटक इन्टरेस्टिंग करतं. प्रत्येक पात्राचं पुढे काय झालं हे सांगणारा कर्टनकॉल लाजवाब.

नाटक    ः     कुसुम मनोहर लेले

निर्मिती ः     महाराष्ट्र रंगभूमी, पद्मशैल ब्युटी पार्लर प्रकाशित

निर्माते ः     संतोष कोचरेकर

मूळ कथा  ः   विनीता ऐनापुरे

लेखक    ः      अशोक समेळ

संगीत    ः     अशोक पत्की

दृश्य संकल्पना व दिग्दर्शन ः    प्रदीप मुळय़े

कलाकार ः     पल्लवी पाटील, प्रियांका कासले, डॉ. मानसी मागीकर, किरण राजपूत, सतीश जोशी, शशांक केतकर, संग्राम समेळ

दर्जा      ः