
अलिबाग विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार महेंद्र दळवी यांनी शेकापच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावला असून पहिल्यांदाच अलिबागवर भगवा फडकवला आहे. शिवसेनेचे महेंद्र दळवी यांनी शेकापचे विद्यमान आमदार सुभाष (पंडित) पाटील यांचा 32611 मताने पराभव केला. महेंद्र दळवी यांच्या रूपाने पहिल्यांदाच शिवसेनेला अलिबाग विधानसभेवर भगवा फडकविण्याचा मान मिळाला आहे. निवडणूक निर्णय अधिकारी शारदा पोवार यांनी महेंद्र दळवी विजयी झाल्याचे घोषित केले. महेंद्र दळवी यांच्या विजयानंतर अलिबाग तालुका हा भगवामय झाला असून शिवसैनिकांमध्ये चैतन्य संचारले होते.
अलिबाग येथील नेहुली क्रीडा संकुल मध्ये सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. पहिल्या फेरीपासून शिवसेनेचे महेंद्र दळवी यांनी मतांमध्ये आघाडी घेण्यास सुरुवात केली. शेवटच्या 27 फेऱ्यापर्यत दळवी यांना भेटलेल्या मताची आघाडी शेकापच्या सुभाष पाटील यांना एकदाही तोडता आली नाही.
शेकापच्या तीस वर्षाच्या सत्तेला शिवसेनेच्या महेंद्र दळवी यांनी सुरुंग लावला आहे. शेकाप विरोधात अलिबाग मुरुडमध्ये असलेली नाराजी मतदारांनी मतपेटीत मत टाकून उघड केली आहे. अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघातील विकासकामे करण्यात शेकापचे विद्यमान आमदार पंडित पाटील हे अपयशी ठरले होते. याचाच फटका मतदारांनी मतपेटीत मत टाकून शेकापला पराभूत केले आहे.
अलिबाग विधानसभा मतदारसंघ हा 1952 पासून शेकापचा बालेकिल्ला आहे. काँग्रेसने चार वेळा या मतदारसंघात विजय संपादन केला आहे तर शेकापने नऊ वेळा शेकापचा वरचष्मा राहिला आहे. शिवसेनेला या मतदारसंघात एकदाही विजय संपादन करता आला नाही. 2014 च्या निवडणुकीत महेंद्र दळवी यांना 16 हजाराने पराभव पत्करावा लागला होता. मात्र यावेळी 32 हजाराचे मताधिक्य घेऊन दळवी हे विजयी झाले आहेत. विजयानंतर महेंद्र दळवी यांची विजयाची भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली. बऱ्याच वर्षांनी अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिकावर विधानसभेचा गुलाल अंगावर उडाल्याने शिवसैनिकात चैतन्य वातावरण तयार झाले आहे.































































