
दिवाळीच्या तोंडावरच बेस्ट कर्मचाऱ्यांना मुंबई उच्च न्यायालयाने आज मोठा दिलासा दिला. औद्योगिक न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत न्यायमूर्ती एन. जे. जमादार यांनी सरसकट सर्वच कर्मचाऱ्यांना बेस्ट प्रशासनाने बोनस द्यावा, असे आदेश दिले. न्यायालयाच्या या आदेशामुळे हजारो बेस्ट कर्मचाऱ्यांमधून समाधान व्यक्त करण्यात येत असून त्यांच्या दिवाळीचा मार्ग मोकळा झाला आहे.
औद्योगिक न्यायालयात…
बेस्ट प्रशासनाने सामंजस्य करारावर सही करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच दिवाळीत सानुग्रह अनुदान (बोनस) देण्याचे जाहीर केले आहे. या प्रकरणी बेस्ट प्रशासनाच्या भूमिकेविरोधात कर्मचारी औद्योगिक न्यायालयात गेले होते तेव्हा औद्योगिक न्यायालयाने सरसकट सर्वच कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस देण्याचे आदेश दिले होते.
प्रकरण हायकोर्टात
सामंजस्य करारावर ज्या कर्मचाऱ्यांनी सहय़ा केल्या नाहीत त्यांना बोनस देता येणार नाही या मागणीसाठी बेस्ट प्रशासनाच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. सुट्टीकालीन न्यायालयाचे न्यायमूर्ती एन. जे. जमादार यांच्या समोर आज या प्रकरणी सुनावणी घेण्यात आली. न्यायमूर्तींनी कर्मचाऱ्यांची बाजू समजून घेत औद्योगिक न्यायालयाने दिलेला निर्णय कायम ठेवला व सरसकट सर्वच कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस देण्याचे आदेश दिले.
31 हजार 500 कर्मचाऱ्यांना लाभ
न्यायालयाच्या या निर्णयामुळे बेस्ट प्रशासनात काम करणाऱ्या 31 हजार 462 कर्मचाऱ्यांना लाभ होणार आहे. यापूर्वी बेस्ट प्रशासनाने सामंजस्य करारावर सहय़ा करणाऱ्या 15 हजार 813 कर्मचाऱ्यांनाच बोनस देण्याचा निर्णय घेतला होता, मात्र औद्योगिक न्यायालय आणि हायकोर्टाने सर्वांनाच बोनस देण्याचे आदेश दिले आहेत.
























































