मुंबईत दोनच मेट्रो मार्गांच्या कारशेडला मिळाली जागा, एमएमआरडीएसमोर कायदेशीर अडचणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आरेमधील कारशेडसाठी हजारो झाडे तोडल्याचे प्रकरण न्यायालयाच्या चौकटीत गेल्यानंतर मुंबईत सुरू असलेल्या 11 मेट्रो मार्गांसाठी कारशेड कुठे कुठे बांधली जाणार याबद्दल मुंबईकरांमध्ये चर्चा सुरू झाली. 11 मार्गांची उभारणी सुरू असली तरी अद्याप दोनच कारशेडसाठी जागा निश्चित करण्यात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) यशस्वी ठरले आहे. इतर कारशेडची प्रकरणे काही ना काही कारणास्तव न्यायालयात अडकल्याने मेट्रो प्रकल्पांना विलंब होत असल्याची माहिती आहे.

मेट्रो प्रकल्पांसाठी कारशेडची महत्त्वाची भूमिका असते. कारशेडमध्ये मेट्रोच्या गाडय़ांची स्वच्छता, दुरुस्ती आणि देखभाल केली जाते. एक कारशेड उभारण्यास किमान दोन वर्षांचा कालावधी लागतो. मुंबईतील बहुतांश मेट्रो प्रकल्प हे डिसेंबर 2021 पर्यंत पूर्ण होणार आहेत. फक्त कुलाबा-वांद्रे-सीप्झ या भुयारी मेट्रोसाठी आरे कॉलनीत कारशेड उभारले जात आहे.

दहिसर ते डी. एन. नगर मेट्रो-2 ए आणि अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व मेट्रो-7 हे दोन मार्ग पुढील वर्षी 2020 मध्ये चालू होण्याची शक्यता आहे, परंतु दोन्ही मार्गांसाठी असलेल्या कारशेडस्ची प्रकरणे न्यायालयात अडकली आहेत. ही दोन्ही कारशेडस् दहिसर येथे विमानतळ प्राधिकरणाच्या जमिनीवर उभारली जाणार आहेत. त्याबदल्यात एमएमआरडीए विमानतळ प्राधिकरणाला गोराई येथील जमीन देणार आहे, परंतु गोराईतील त्या जमिनीसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात खटला सुरू असल्यामुळे कारशेडचे काम गेल्या दोन वर्षांपासून रखडले आहे.

मालवणीत कार शेड
एमएमआरडीएने आता मेट्रो-2 ए आणि मेट्रो-7 या दोन्ही मार्गांसाठी मालवणी येथे संयुक्त कारशेड उभारण्याचा निर्णय घेतला आहे. मालवणीतील ती जागा एमएमआरडीएचीच असून तिथे लवकरच काम सुरू करण्यात येईल अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱयाने दिली. त्याचप्रमाणे मंडाले येथे मेट्रो-2 बी मार्गासाठी कारशेड उभारले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

मोगरपाडाला विरोध
मेट्रो-4, मेट्रो-4 ए, मेट्रो-10 आणि 11 या मार्गांसाठी मोगरपाडा येथे कारशेड उभारण्याचे ठरले आहे, परंतु स्थानिक नागरिकांना त्यासाठी जमीन देण्यास विरोध केला आहे. ठाणे-भिवंडी-कल्याण या मेट्रो-5 मार्गासाठीही कोनगाव येथे कारशेड उभारले जाणार आहे. त्यासाठी किमान 20 हेक्टर जागा लागणार आहे, परंतु तिथेही स्थानिक ग्रामस्थांनी जमीन देण्यास नकार दिला असल्याचे समजते.